पुणे: हडपसर विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुक २०२४ करिता एकूण ५३२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार केंद्र सुसुत्रीकरणांतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघातील खुल्या जागेत तात्पुरत्या पत्राशेड मधील १४७ मतदान केंद्रांचे पक्क्या इमारतीतील खोल्यामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या केंद्र बदलाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी कळविली आहे.
हडपसर स्वीप पथकातर्फे स्टिकर, बॅनर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. मतदारापर्यंत ही माहिती मतदानपूर्वी पोहोचवण्यासाठी बदल झालेल्या केंद्राचा तपशील voter helpline App व https://electroalsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. तसेच स्टिकर व बॅनर वर दिलेला क्यूआर कोड, मोबाईल द्वारे स्कॅन करून ठिकाणात बदल झालेल्या मतदान केंद्राचा तपशील उपलब्ध करून घेता येईल, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली.
यावेळी जिल्हा समन्व्यक अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार नागनाथ भोसले, तहसीलदार शैलजा पाटील, नायब तहसीलदार जाई कोंडे, हनुमंत खलाटे, हेमंत घोलप,सचिन खडके, विजय घुमटकर, नितीन तुपे,संग्राम पवार, शैलेश शिंदे, संतोष गायकवाड, गणेश देशमुख, रवी ऐवळे, पद्माजी डोलारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन हडपसर स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम यांनी केले.