पुणे- लोणी भापकर येथील सभेत शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार पुन्हा वयावर घसरले आणि मुलगी झाली तर नातूच काढला .. असे म्हणत अरे मी पण तुमचा पुतण्याच आहे न म्हणत कौटुंबिक भावनिक कार्ड खेळले .
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची बारामती मतदारसंघात लोणी भापकर येथे सभा झाली यावेळी बोलताना ते म्हणाले की,ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. इतरांचे वय पाहता भविष्यात बारामतीचे सर्वकाही मलाच पाहायचे आहे, असे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत म्हणालेत.मी निवडणूक डोळ्यांपुढे ठेऊन काम करत नाही. मी फुशारक्या मारत नाही. माझे काम बोलते. लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता, तो तुम्ही घेतला. पण आताची निवडणूक माझ्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.असेही ते म्हणले.
काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यात त्यांनी कुणावरही टीका केली नाही. मागच्यावेळी केली, तर गडबड झाली. पण आता केवळ विकासावर बोलले. समोरचे लोक लोकसभा निवडणुकीत सुप्रियाकडे लक्ष द्या, ही साहेबांची शेवटची निवडणूक आहे असे सांगायचे. पण आता नातवाकडे लक्ष देण्यास सांगत आहेत. हे अवघडच आहे. मी सुद्धा पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच काढला. मी सुद्धा तुमच्या मुलासारखाच आहे ना?
अजित पवार यांच्या आज लोणी भापकर यांच्यासह जळगाव कडेपठार व मेदड येथेही सभा होणार आहेत. अजित पवार पुढे म्हणाले, बारामतीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवा असणारा निर्णय घेतला. पण ही निवडणूक माझ्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात काही प्रमुख नेते आहेत. त्यात माझे नाव येते. नाव कमवायला वेळ लागतो. 2004 पासून मला लोक सीनिअर म्हणायला लागले. तेव्हापासून मी राज्याच्या राजकारणात लक्ष देत आहे. शरद पवार साहेब राज्यात 30 वर्षे काम केल्यानंतर दिल्लीला गेले.
अजित पवार यांनी यावेळी आपले पुतणे तथा शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनाही टोला हाणला. ते म्हणाले, आपल्या तालुक्यातील तरुण काम करत असतील तर त्याला मलिदा गँग का म्हटले जाते? आज विरोधात बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे काहीजण मलिदा गँग म्हणत आहेत. आम्ही काम करताना जात किंवा नात्यागोत्याचा विचार केला नाही. गावातले पुढारी नीट वागत नाहीत. त्याचा राग माझ्यावर निघतो. पण ही निवडणूक झाल्यानंतर मी पक्षातील नव्या चेहऱ्यांना पुढे आणेल.
शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तालुक्याला कसा फायदा होईल हे पाहिले. साहेब 1989 मध्ये मी अजितला तिकीट देणार नाही असे म्हणाले होते. त्यानंतर 1991 ला मला तिकीट दिले. आता काही लोकांना काल काम सुरू केले की आज आमदार झाल्याचे स्वप्न पडत आहेत. मला इंग्रजी येते किंवा येत नाही हा प्रश्न नाही. पण त्यानंतरही मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.
मी साडेसहा लाख कोटींचे बजेट सादर करतो. त्याला साडेसहा लाख कोटीतील एक टिंब काढून दाखवा म्हणावे. तो माझा पुतण्या आहे. मी त्याच्यावर टीका करण्याची गरज नाही. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभे करण्याची गरज नव्हती, असेही अजित पवार यावेळी बारामतीच्या जनतेला विधानसभा निवडणुकीत आपल्यामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करताना म्हणाले.