पुणे-भाजपने लोकसभा निवडणुकीत पैशाचा बेसुमार वापर करूनही जनतेने त्याला थारा दिला नाही. तीच परिस्थिती आता विधानसभा निवडणुकीत आहे. पुण्यातील मतदार हा स्वाभिमानी असून ते भाजपला निवडणुकीत धडा शिकवतील. हजारो कोटींचे टेंडर भाजपने काढून त्यातून टक्केवारी कमावली आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, त्या पैशाचा वापर निवडणुकीत होत आहे, असे मत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
धंगेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेऊन विकासकामे सांगितली. पण पुण्यातील मेट्रो डी पी आर हा काँग्रेस पक्षाने सुरू केला असून देशात प्रथम मेट्रो सुरू करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. पुण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी प्रश्न बिकट होत असून ती सुधारण्यात सरकारला अपयश आले आहे. पुण्यातील वाढते प्रदूषण देखील प्रमुख समस्या आहे. पण त्याकडे लक्ष्य दिले जात नाही. काँग्रेस काळात अनेक राष्ट्रीय संस्था पुण्यात स्थापन झाल्या आहे. त्यामुळे विद्येचे माहेरघर याचा चेहरा मोहरा काँग्रेस काळात बदलला गेला आहे.
पुण्यात पंतप्रधान दरवेळी येऊन केवळ वेगवेगळी आश्वासने देतात, पण त्याची पूर्तता करत नाही हे वास्तव आहे. पुण्यात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे पण केवळ भावनिक मुद्दे समोर करून भाजप राजकारण करत आहे. पुणे ऑटोमोबाईल हब असताना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग स्थलांतरित होत आहे. जातीयवाद ,धार्मिक मुद्दे समोर केले जात आहे, पण आता जनता सुज्ञ आहे, असेही धंगेकर म्हणाले.