पुणे:गरीब कुटुंबातून पुढे आलेले माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे हे कधी आपली जन्मभूमी, वस्ती आणि झोपडपट्टी भागाला विसरले नाहीत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बागवे यांनी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले. झोपडीतून हक्काच्या घरात नेले. गरिबांना हक्काचा निवारा दिला, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी रमेश बागवे यांच्या कामाबद्दल मंगळवारी गौरवोद्वगार काढले.
रमेश बागवे यांना प्रशासकीय आणि विधानसभेच्या कामाचा अनुभव, तसेच विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांना कँटोन्मेंटच्या प्रश्नांची जाण आहे. कँटोन्मेंट बोर्डाची निवडणूक झाली नसल्याने येथील विकास खुंटला आहे. बागवे विजयी झाल्यास ते कँटोन्मेंटचे महापालिकेत त्वरित विलीनीकरण करून घेतील. आजची राजकीय , धार्मिक परिस्थिती पाहता, सामाजिक ऐक्य आणि विकासासाठी मतदारांनी रमेश बागवे यांनाच निवडून द्यावे, अशी कळकळीची विनंती मी करतो. कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, तसेच या भागातील धार्मिक व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी बागवे यांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांची पदयात्रा मंगळवारी उत्साहात पार पडली. यानिमित्त शिवरकर यांनी मतदारांना बागवे यांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले. रमेश बागवे गरीब कुटुंबातून पुढे आलेले सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आहेत. महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी ठसा निर्माण केला. सामान्य माणूस आणि झोपडवासीयांच्या पाणी, वीज, रस्ते, स्वच्छतागृहे, शाळा, आरोग्य या गरजा पूर्ण करून त्यांनी विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या. कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विकासकामे केली. कँटोन्मेंटआधी पर्वती मतदारसंघातून निवडून आले, तेव्हा त्या भागाचाही मोठा विकास त्यांनी घडवला, अशी प्रशंसा शिवरकर यांनी केली.
कँटोन्मेंटमध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. बागवे यांनी सर्वधर्मसमभाव, सामाजिक ऐक्य आणि सामाजिक न्याय हा काँग्रेसचा विचार येथे रुजवून सामाजिक सलोखा वाढवला, असे सांगून शिवरकर यांनी बागवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
दादापीर दर्गा येथे चादर चढवून, तसेच भवानीमाता मंदिर आणि बालाजी मंदिर येथे दर्शन व आशीर्वाद घेऊन बागवे यांची पदयात्रा मंगळवारी निघाली. बनकर तालीम, सरस्वती सोसायटी, दुल्हा-दुल्हन कब्रस्तान, जिज्ञासा एसआरए वसाहत, पत्र्याची चाळ, राजेवाडी झोपडपट्टी, पवार वाडा, इस्लामपुरा आणि नाना पेठ या भागांत कार्यकर्त्यांच्या गर्दीत पदयात्रा पार पडली. पेढे वाटून आणि फटाके फोडून स्थानिक कार्यकर्त्यांनी बागवे यांचे स्वागत केले. ‘कँटोन्मेंटचा विकास म्हणजे रमेशदादा’ अशा घोषणेने परिसर दणाणून गेला. महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा विश्वास दिला. बागवे यांनी फळविक्रेते, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी, स्थानिक मंडळांचे कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी, तसेच मुस्लिम समाजाशी संवाद साधून कँटोन्मेंटच्या विकासाचे वचन दिले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. अमोल देवळेकर, तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, उस्मान तांबोळी, चेतन अग्रवाल, बाशूभाई शेख, सुनील घाडगे, बुधाजी मोरे, संजय सोनवणे, गौतम कांबळे, अक्षय अवचिते, विठ्ठल थोरात, अमजद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते.