पुणे: विमाननगर आज प्रबळ विकासाचा नारा घेऊन बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा संपन्न झाली. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या पठारे यांनी मतदारांना रोजगाराच्या संधी, मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात प्रगतीचे आश्वासन दिले.
ही पदयात्रा गणपती चौक, यमुना नगर, दत्त मंदिर चौक, म्हाडा कॉलनी, गंगा पुरम सोसायटी, संजय पार्क सोसायटी, विमान दर्शन अशा विविध मार्गांवरून निघाली, आणि या मार्गावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी बापूसाहेब पठारे यांचे नागरिकांनी हार-फुलांनी स्वागत केले.
बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेचा उद्देश म्हणजे विमाननगर भागात विकासाचे एक नवे पर्व सुरू करणे आहे. प्रत्येक नागरिकाला प्रगतीचा भागीदार बनवण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले. ते म्हणाले, “माझा एकच संकल्प आहे – सर्वांगीण विकास. मेट्रोचा विस्तार जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत करण्याचा माझा संकल्प आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचा मान राखीन.”
पदयात्रेच्या दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांचे थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांनी गावात स्वच्छता, पाण्याचा योग्य पुरवठा, चांगले रस्ते, महिलांसाठी सुरक्षा, तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांचे प्रमुख उद्दीष्ट आहे विकासाला गती देणे आणि स्थानिकांना एक उत्कृष्ट जीवनमान उपलब्ध करणे.