पुणे: विधानसभा निवडुकीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात येत आहे. हडपसरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना प्रचारात मागे सोडत प्रशांत जगताप यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी जात मतदारांचा पाठिंबा मिळवण्यात जगताप यशस्वी ठरले आहेत. त्यामुळेच हडपसरमध्ये ‘लहान-थोरांचा एकच निर्धार, यंदा प्रशांत जगताप हेच आमदार’ असे चित्र पाहायला मिळत आहे. असा दावा जगताप समर्थक करत आहेत.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मंगळवारी मॉर्निंग वॉक करीत प्रचाराची सुरुवात केली. कात्रज उद्यान व तलावाजवळ नागरिकांसोबत संवाद साधला. नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. विद्यमान आमदार नागरिकांना मुबलक पाणी, चांगले रस्ते, ड्रेनेज, प्रदूषणमुक्त वातावरण, ट्रॅफिकमुक्त वाहतूक देण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत, अशी भावना सर्वांनीच व्यक्त केली. हीच परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी परिवर्तन घडवून प्रशांत जगताप यांना विजयी करायचे आहे, असे शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले.
कात्रज, कोंढवा, हांडेवाडी, सय्यदनगर परिसरात नागरिकांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते मोहसीनभाई शेख यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. समाजातील युवकांची ताकद जगताप यांना देण्याचा निर्धार त्यांनी केला.
प्रशांत जगताप म्हणाले, “महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार महापुरुषांचा अपमान केला जातो. जनतेच्या समस्या सोडवण्यापेक्षा घोषणांचा पाऊस पडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करताहेत. महाराष्ट्राशी गद्दारी करून शिवसेना व राष्ट्रवादीतून भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाऊन बसलेल्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. हडपसरच्या विकासाची दिशा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा आपल्यासोबत आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या आणि मतदारसंघाच्या विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून द्यावे.”