पुणे-राज्यातील विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रात शुक्रवार पासून सभा सुरू झाल्या आहे. राज्यात विविध जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, बारामती मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सभा नको, असे अजित पवार यांनी मत व्यक्त केले होते. याबाबत खुलासा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, एका पत्रकाराने मला विचारले की, बारामतीत पवारांची सभा आहे का? तर मी म्हटल की, देशातील राष्ट्रीय नेते जेव्हा राज्यात येतात, तेव्हा ते जिल्ह्यात सभा घेतात. पुण्यात देखील त्यांची सभा असून पुण्यात बारामती येतोच ना, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तालुका स्तरावर नाही, तर जिल्ह्यात सभा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बारामतीत भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी येऊ नये, कारण राज्यात अनेक ठिकाणी खूप काम असून मी एकटा तिथे पुरेसा आहे, असेही अजित पवार म्हणाले.
पुणे शहरातील वडगाव शेरी मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची जाहीर सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली होती, त्यावेळेस ती गोष्ट वेगळी होती. तेव्हा तिथे अजित पवार नावाचा कोण तरी व्यक्ती उभा होता आणि तेव्हा त्यांना अजित पवारला पराभूत करायचे होते, म्हणून त्यांनी बारामतीत सभा घेतली होती. आता त्यांना पराभूत करायचे नाही, तर मला निवडून आणायचे आहे. म्हणून त्यांनी सभा नाही घेतली.
एका पुस्तकात जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या संदर्भात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. परंतु भुजबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. यावर अजित पवार म्हणाले की, छगन भुजबळ यांनी याबाबत पुरेसा खुलासा केला आणि ते या बाबत न्यायालयात देखील जाणार आहे असे त्यांनी सांगितल आहे.अलीकडे निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येत आहे, तसे विरोधकांकडून महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक बाजूला करून नवीन नरेटीव्ह सेट केला जात आहे. हा निवडणुकीचा मुद्दा नाही. राज्य पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हातात द्यायचे, हा मतदारांच्या समोर महत्वाचा मुद्दा आहे, असेही अजित पवार म्हणाले.