पुणे- मतदार राजाला एकच विनंती आहे की, कृपया भूलथापांना बळी पडू नका. महाराष्ट्रातील उद्योग पळवले गेले, यात काही सत्यता नाही. जगातली सगळ्यात जास्त गुंतवणूक ही भारतामधील महाराष्ट्रात होते. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही.असे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
आज उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे विधानसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार सुनिल टिंगरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी उत्साहात साजरा केला. आता मात्र तमाम पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं, असं आवाहन यावेळी केलं.
ते म्हणाले,’ यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गाफिल राहून अजिबात चालणार नाही. सर्वांनी एक जीवानं कामं करायची आहेत. काहीजण दमदाटी करू पाहत आहेत. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, या लोकांना विधिमंडळाचा दरवाजा मी दाखवला. मात्र माझं एकच सांगणं आहे की, कुणाकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. कामाच्या बाबतीत आम्ही सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चिराग नगरमध्ये स्मारक उभारायचं आहे, त्याच्याकरता ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी मार्टी संस्था आपण काढली आहे. सर्व समाज घटकाला आपला वाटावा असा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सादर केला आहे.राज्य सरकारनं सुरू केलेल्या तमाम शासकीय योजना जशा की, माझी लाडकी बहीण योजना, वीजबिल माफी, मुलींना मोफत शिक्षण, प्रशिक्षण भत्ता, एक रुपयात पीक विमा आदी योजना आपल्याला पुढची पाच वर्षे सुरूच ठेवायच्या आहेत. या योजना विरोधक बंद पाडू पाहत आहेत. आपल्याला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. केंद्र सरकार आपल्या विचारांचं असल्यानं राज्याला बळकट करण्याचं काम आम्ही करत आलो आहोत.