पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात २०२४ निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (इव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) मशीन्सचे दुसरे रँडमायझेशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर (RO) हँडबुकमधील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करत ही प्रक्रिया राबवण्यात आली.
या प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली आणि तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यात आली. इव्हीएम कक्षाचे नोडल अधिकारी सचिन आखाडे, मंडळ अधिकारी किशोर पाटील, गजानन किरवले आणि नारायण पवार यांनी उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
प्रशिक्षण सत्रादरम्यान, निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या रँडमायझेशन प्रक्रियेत प्रत्येक मशीनचे विशिष्ट मतदान केंद्रावर असलेले स्थान निश्चित करण्यात आले असून, यामुळे निवडणुकीत पारदर्शकता राखली जाईल.
कार्यक्रमात उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सच्या वापराची संपूर्ण माहिती देण्यात आली. EMS २.० प्रणालीद्वारे तयार केलेली, मशीनच्या सिरियल नंबरसहित प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्त केलेली यादी उमेदवार/प्रतिनिधींना देण्यात आली.