पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कार्यालयात विविध निवडणूक परवानग्यांसाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पदयात्रा, स्टार प्रचारकांच्या सभा,पक्षाच्या नेत्यांच्या सभा,लाउडस्पीकर वापर, आणि पॅम्प्लेट वाटप यासारख्या विविध निवडणूक प्रक्रियांसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकच लगबग आहे.
खडकवासला मतदारसंघातील निवडणूक कार्यालयाच्या एक खिडकी कक्षातून सुविद्य पवार, शैलेंद्र सोनावणे, आणि संदीप रेणुसे या अधिकारी मंडळींनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. उमेदवारांनी प्रचाराच्या नियोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा दिल्यामुळे गर्दी व्यवस्थापन सुलभ झाले आहे.
पदयात्रा आणि मोठ्या प्रचारसभांसाठी विशेष परवानगी, तसेच लाउडस्पीकरच्या वापरावर वेळ व ठिकाणानुसार निर्बंध, पॅम्प्लेट वाटपासाठी नियमानुसार परवानगी या सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींवर अधिकारी मंडळींनी उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यामुळे मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पडण्यास मदत होणार असून, सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळते.