पुणे-व्यावसायीकाला रस्त्यात गाठून अडवण्याचा प्रयत्न करून कारला दुचाकी आडवी लावून पैशाची मागणी करून नंतर गाडीवर दगड फेकून मारत लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार अर्ज पर्वती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याबाबत फर्निचर व्यावसायीक संतोष पुनमाराम सुथार (रा.वारजे माळवाडी) यांनी दुचाकीवर आलेल्या आठ जणांविरोधात तक्रार दिली आहे.
तक्रार अर्जानुसार नेहमी प्रमाणे तक्रारदार हे दुकान बंद करून त्यांच्या कारमध्ये रात्री आठ वाजता त्यांची गाडी पानमळा परिसरात आली. तीन दुचाकीवर असलेल्या आठ जणांनी त्यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतोष यांनी हॉर्न वाजवल्यानंतर टोळक्याने त्यांच्या गाड्या कारसमोर आडव्या घातल्या. त्यांच्या गाडी जवळ येऊन हुज्जत घालत असतानाच त्यांनी पैशाची मागणी केल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. यावेळी काही तर वेगळे घडत आहे अशी जाणीव होताच तक्रारदाराने तात्काळ गाडीच्या सर्व काचा लावून गाडी लॉक करून घेतली. त्यातील एकाने गाडीवर दगड फेकून मारला तर दोघांनी त्यांच्या कमरेला लावलेले धारदार हत्यार दाखवले. त्याचवेळी तक्रारदार फोन काढून व्हिडीओ बनत असताना आरोपींनी समोरील काचेवर दगड भिरकावला.
हा सर्व प्रकार घडताना व कारवर दगड फेकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत हॉर्न वाजविण्याच्या कारणातून झालेला हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र आरोपी निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.