मुंबई : आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्या चेहऱ्यावर भाष्य करत टीका केली. त्यांच्या या अभद्र विधानानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अनेक नेत्यांनी खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील खोत यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. दरम्यान, खोत यांनी त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या याच विधानावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी खोत यांना थेट फोन कॉल करून आपली नाराजी कळवली आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकाण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, यांच उदाहरण घालून दिलेलं. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धत असते. तेच आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे. तीच पद्धत पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, पवार साहेब, विलासराव देशमुख अशा अनेक मान्यवरांनी पुढे तीच पद्धत चालू ठेवली. पण सदाभाऊ खोत यांनी काल जे काही वक्तव्य केलं, ते निषेधार्ह आहे. त्याचा तीव्र शब्दांत मी कालच निषेध केला आहे. मी फक्त एवढ्यावरच थांबलेलो नाही. मी खोत यांना फोनही केला होता. तुमचं हे स्टेटमेंट आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. हे तुम्ही बंद करा, असं मी त्यांना सांगितलं. अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर बोलणं, हे चुकीचं आहे.