आडकर फौंडेशनतर्फे आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : सुशिक्षित व्यक्तींमध्ये अजूनही आरोग्य साक्षरता नाही तसेच दुसरीकडे अवयव दानाविषयी पुरेशी जागृतीही नाही. अवयव दानाचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी असल्याने योग्य वेळी अवयवदान न झाल्याने रुग्णांचे मृत्यू ओढवतात. अवयव दानासंदर्भातील नागरिकांच्या मनातील भीती, शंका दूर करण्याचे वारंवार प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा आडकर फौंडेशनतर्फे बुधवारी (दि. 6) डॉ.भोंडवे यांच्या हस्ते कोमल पवार स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे स्तुत्य काम आडकर फौंडेशनतर्फे केले जात आहे, असे नमूद करून डॉ. भोंडवे यांनी अवयवदान कोण करू शकतो याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. आरोग्य शास्त्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कृत्रिम रक्तपेशी तयार करण्याविषयी संशोधन सुरू आहे. यात जर यश आले तर भविष्यात रक्तदानाची गरज कमी होऊ शकते असे ते म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना आरती देवगावकर म्हणाल्या, आयुष्यातील छोट्या-छोट्या समस्यांचा आपण बाऊ करतो. पण समाजात गेल्यानंतर आरोग्यविषयक समस्या काय आहेत हे समजे आणि आपले दु:ख त्यांच्या दु:खापेक्षा किती छोटे आहे याची जाणिव होते. अवयवदानाविषयी जागृती करतानाच अवयवदानाचे प्रमाण कसे वाढेल याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मानपत्र वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पुनर्जन्म’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात जयंत भिडे, मीरा शिंदे, विजय सातपुते, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, साधना शेळके, विद्या सराफ, कांचन पडळकर, ऋचा कर्वे, प्रतिभा पवार, मिनाक्षी नवले, स्वाती सामक, प्रभा सोनवणे यांनी आपल्या रचना सादर केल्या.