पुणे-महापालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय, कमला नेहरु रुग्णालय व राज्य शासनाचे ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्यावरील ताण कमी करण्याच्या हेतूने शहराच्या मध्य पुण्यातील महापालिकेच्या आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर दिल्याचा दावा कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी केला.
रासने यांच्या प्रचारार्थ आज दत्तवाडी परिसरात मांगीरबाबा मंदिर, म्हसोबा चौक, शामसुंदर सोसायटी, राजेंद्र नगर, पीएमसी कॉलनी, गांजवे चौक या भागात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, धनंजय जाधव, किरण साळी, बाळासाहेब किरवे, गौरव साईनकर, रमेश काळे, स्वाती मोरे, अनिता बोडके, तानाजी ताकपेरे, विजय गायकवाड यांचा प्रमुख सहभाग होता.
रासने म्हणाले, महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी पहिले वैद्यकीय महाविद्यालय, कमला नेहरू रुग्णालयात महापालिकेची पहिली रक्तपेढी, पहिला अतिदक्षता विभाग, नवजात अर्भक व 12 वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी ह्दयरोग तपासणी केंद्र, चंदुमामा सोनावणे रुग्णालयात नवजात बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक प्रसूतिगृह, डायलेसिस केंद्र या आरोग्य सुविधा सुरू केल्या.
रासने पुढे म्हणाले, कोरोनामुळे अत्याधुनिक आणि बळकट आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. विस्तारणाऱ्या शहरात आपल्यानजीक उत्तम आरोग्य सुविधा देणारी केंद्रे विकसित करणे, हा आमच्या आरोग्यविषयक धोरणाचा भाग आहे. त्यानुसार मध्य वस्तीमध्ये असलेली रुग्णालये विकसित करणे आणि आरोग्य सुविधांच्या क्षमतावर्धनावर भर देत आहोत.