मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं ५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेतून पंचसुत्रीची घोषणा करण्यात आलेली आहे. महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महालक्ष्मी योजनेला उत्तर देण्यात आलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील २ कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनं महालक्ष्मी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला महायुती सरकार महिलांना बस प्रवासात ५० टक्क्यांची सवलत देत आहे. त्यामुळे महिलांना एसटी प्रवास करताना अर्धे तिकीट लागतं. पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना, मुलींना मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे.शेतकऱ्यांना महाविकास आघाडीनं महत्त्वाची घोषणा केली आहे.
महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर
1. जातीनिहाय जनगणना – 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार.
2. कुटुंब रक्षण – 25 लाखांपर्यंत आरोग्य विमा देणार.
3. महालक्ष्मी योजना – महिलांना महिन्याला 3 हजार रुपये देणार
4. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवकांना महिन्याला 4 हजार रुपये देणार.
5. शेतकऱ्यांना कर्जमाफी – नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी.
राहुल गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत. आज प्रत्येक गोष्टीवर टॅक्स लावला जात आहे. भाजपच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढली. भारतात गरिबांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. अदानी आणि अंबानी रोजगार देणार नाहीत, तसेच महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार हिसकावले जात आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी महायुती तसेच केंद्र सरकारवर केला आहे.
हे विचारधाराची लढाई आहे एका बाजूला बीजेपी आरएसएस आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी. एका बाजूला आंबेडकरांचे संविधान एकता समानता मोहब्बत रिस्पेक्ट आणि दुसऱ्या बाजूला समोरून नव्हे तर लपून बीजेपी आणि आरएसएसचे लोक या संविधानाला संपवणार. हे समोरून बोलणार नाहीत कारण संपूर्ण देश यांना संपवून टाकू शकतो म्हणून हे लपून या संविधानाला संपवण्याचा घाट घालत आहेत.
देशाच्या व्हाईस चान्सलर यांची लिस्ट काढून बघा त्यात तुम्हाला मेरिट कुठेच दिसणार नाही केवळ त्यांच्या क्वालिफिकेशन हे आरएसएस मेंबरशिप चा आहे. बनायचा असेल तर आरएसएस ची मेंबरशिप घ्या यांना कुठल्याच विषयाबद्दल काहीच माहित नसतं.
महाराष्ट्रात पूर्वीचे सरकार हे इंडिया आघाडीचे सरकार होते आणि त्या सरकारला चोरी करत पैसे देत हटवण्यात आले. का, कारण त्यांना दोन-तीन अरबपतींची मदत करायची आहे. मुंबईला माहिती आहे महाराष्ट्राला माहित आहे की धारावीची जमीन एक लाख कोटींची जमीन तुमच्या हक्काची जमीन गरिबांची जमीन तुमच्या डोळ्यासमोर हिसकावली जात आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या चे प्रोजेक्ट होते एप्पल ची कंपनी असो बोईंग विमानाची कंपनी, तुमच्या पासून हिसकावून दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवली जात आहे. पाच लाख युवकांना रोजगार मिळाला असता. हे सगळे प्रोजेक्ट गुजरात मध्ये पाठवण्यात आले. सेमी कण्डक्टर प्लांट, आयफोन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, पेट्रोल केमिकल प्रोजेक्ट हे सगळे हे महाराष्ट्राचे होते त्यातून युवकांना रोजगार मिळणार होता हे सगळे तुमच्या पासून हिसकावण्यात आले.
राहुल गांधी म्हणाले, या संविधानामुळे अंबानी यांच्यावर मर्यादा आणता आल्या आहेत. या संविधानामध्ये महापुरुषांचे विचार आहेत, यात आंबेडकरांचा आवाज आहे, फुलेंचा आवाज आहे, गांधीजींचा आवाज आहे. हिंदुस्थानाचा आवाज गरिबांचा आवाज दलितांचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज या संविधानात आहे. संविधान हे केवळ पुस्तक नाही. इंडिया आघाडी तुम्हाला आश्वस्त करते की काहीही झाले तरी संविधानाला कोणी हात लावू शकत नाही याला कोणीच संपवू शकणार नाही इंडिया आघाडी एक साथ आहे आणि हिंदुस्थानाची जनता एकत्र आहे.
मविआ सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. याशिवाय नियमित कर्जफेडीसाठी ५०,००० रुपयांचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४ हजार रुपयांपर्यंतची मदत करण्यात येणार आहे. राज्यात सरकार आल्यास जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवणार अशी घोषणा राहुल गांधींनी केली. कुटुंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत विमा देण्याची घोषणादेखील महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे.महालक्ष्मी योजनेची घोषणा करताना राहुल गांधींनी महायुती सरकारवर तोफ डागली. राज्य सरकार अदानींसाठी काम करत आहे. महागाई, कराच्या स्वरुपात लोकांची अक्षरश: लूट सुरु आहे. त्या लुटीचा मोठा फटका सामान्यांना बसला आहे. त्यामुळेच त्यांना प्रवासात पूर्ण सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. सामान्य कुटुंबाच्या खिशावर ९० हजारांचा डल्ला मारला जात आहे. त्या बदल्यात महिलांना केवळ दीड हजार रुपये दिले जात आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बंधुंनो भगिनींनो आणि मातांनो, या वाक्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे म्हणाले, नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता निवडणुकांचे फटाके फुटायला लागले आहेत. आपल्याकडे चांगले आयटम बॉम्ब आहेत आणि पलीकडे फुसके फटाके आहेत. 23 तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. त्याचा निश्चय करण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत.कालपासून माझ्या जाहीर सभा सुरू झाल्या. सभा सुरू होण्याआधी दोन-तीन दिवस मी काही जणांशी बोलत होतो सगळे म्हणत होते अजून काही उत्साह दिसत नाही हो, त्यांना म्हटलं थांबा जरा फराळ तर होऊ द्या. फराळ कसा करायचा महागाई एवढी वाढली आहे. अनेक घरांमधून फराळातले पदार्थ गायब झाले आहेत. म्हंणलं हेच तर फटाके उद्याच्या निवडणुकीत फुटणार आहेत. योजनांचा पाऊस पडतो आणि आणि अंमलबजावण्याचा दुष्काळ हे नेहमीचे वाक्य आहे.जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते. कारण महागाई वाढते. बाकीचे आनंदाचा शिधा वगैरे ठीक आहे पण त्या आनंदाचा शिधामध्ये सुद्धा अळ्या आणि लेंड्या सापडत आहेत. कसला आनंद आहे यांचा? गरिबांना लेंड्या देतायेत हा तुमचा आनंद? आणि असे बकवास लोक आपल्यावर राज्य करत आहेत? म्हणून मी सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर परत एकदा या ज्या पाच जीवनावश्यक वस्तू आहे त्यामध्ये तेल आलं साखर, तांदूळ, गहू, जे काही आहेत त्यांचे भाव आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता हे स्थिर ठेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही.आपल्याला कळतच नाही की आपला खिसा कापला जात आहे. प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावला जात आहे. उद्या श्वास घ्यायला सुद्धा टॅक्स लावतील. आणि इकडे योजनांचा पाऊस पाडत आहेत. आपण जे करतो ते खुलेआम करतो, आपला जाहीरनामा सुद्धा जाहीर आहे लोकांसाठी आहे. महिलांसाठी जी योजना आहे ती नुसतीच चालू ठेवणार नाही तर त्यामध्ये भर टाकणार आहोत. शरद पवार साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज हे तीन लाखांपर्यंत माफ करणार आहोत. त्यापूर्वी दोन लाखांचे आपण करून दाखवले आहे.महाराष्ट्रातील युवकांना जसे मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे तसेच मुलांना देखील मोफत शिक्षण आपण देणार आहोत. त्यानंतर नोकरी मिळेपर्यंत काय करायचं तर ते या पंचसूत्री मध्ये आहे की प्रत्येक बेरोजगार तरुणाला दर महिन्याला आपण चार हजार रुपये देणार आहोत. जर तरुण आपला भविष्य असेल आणि या कपाळ करंट्या सरकारमुळे नासला जात असेल तर तरुणाने करायचं काय.लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण जी घोषणा केली होती संविधान बचावाची याला विरोधकांनी फेकनरेटीव्ह. संविधान वाचवायचाच आहे अजून ते पूर्ण झालेला नाही. संविधान बचाव हे भाजपला फेकनरेटीव्ह वाटत असेल तर धारावीचा जो मुद्दा जो काढतोय ते केवळ धारावीच नव्हे तर अख्खे मुंबई हे अडाणीच्या घशामध्ये घालणारे जीआर निघाले आहेत. हे निघालेले जीआर फेकनरेटीव्ह होऊ शकतात. यांना संपूर्ण मुंबई अदानीमय करायची आहे. आमच्या सरकार आल्यानंतर हे सगळे जीआर रद्द करू असा आश्वासन मी तुम्हाला देतो.