पुणे, दि. ६ नोव्हेंबर, २०२४ : आमच्यासारख्या अनेक बहिणींना सिद्धार्थ शिरोळे आणि शिरोळे परिवाराने कायमच मदतीचा हात दिला आहे. काही कुटुंबांना उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्यासाठी सिद्धार्थ शिरोळे हे कायमच लाडके भाऊ आहेत, अशी प्रतिक्रिया संगमवाडी गावठाणातील विठ्ठल मंदिरात झालेल्या महिला मेळाव्यात उमटली.
भाजप महिला आघाडीच्या वतीने संगमवाडी गावठाणात विठ्ठल मंदिर येथे झालेल्या या मेळाव्याला सुमारे चारशे महिलांनी उपस्थिती लावली होती. सुजाता सिद्धार्थ शिरोळे, अॅड. वर्षा डहाळे यांनी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली महिला सन्मान आणि आत्मनिर्भरतेच्या भूमिकेला पूरक काम सिद्धार्थ शिरोळे करत आहेत. शिवाजीनगर मतदारसंघाचा विकास करताना त्यांनी महिलांच्या समस्या सोडवण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. आपल्या या लाडक्या भावाला आपण पुन्हा विधानसभेत पाठवले पाहिजे, असे आवाहन यावेळी अॅड. वर्षा डहाळे यांनी उपस्थितांना केले.
संगमवाडी परिसरातील महिला या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. या महिलांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव यावेळी सांगितले. घरातल्या आजारपणाचा विषय असो, मुलांच्या प्रवेशाचा मुद्दा असो की घराच्या डागडुजीचा प्रश्न असो, या सगळ्या विषयांसाठी शिरोळे कायम मदत करतात. त्यांचे अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे ते आमच्या कुटंबाचा एक भाग, अगदी जिवाभावाचे लाडके भाऊ बनले आहेत, असे उद्गार या महिलांनी काढले.
मेळाव्याला शिवाजीनगर महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा कुऱ्हाडे, महिला आघाडी शहर सरचिटणीस भावना शेळके, नगरसेविका स्वाती लोखंडे, राजश्री काळे, मेळाव्याच्या संयोजिका सुजाता सोरटे आदी उपस्थित होत्या.
तिहेरी तलाक, लाडकी बहीण अशा योजनांमुळे मोदी सरकारची महिलांविषयीची आदराची भूमिका अधोरेखित झाली आहे. महायुतीच्या राज्यात महिला सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनल्या आहेत. ही स्थिती टिकवण्यासाठी सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवू या, असे आवाहन अॅड. वर्षा डहाळे यांनी यावेळी केले.