मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर आघाडी धर्माला हरताळ फासण्याचा आरोप केला आहे. यासंबंधी त्यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा सूर बदललेला दिसून येत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातील भाजपने अमित ठाकरे यांना दिलेल्या कथित पाठिंब्यावर शिंदे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाने माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी मनसेने राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मैदानात उतरवले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची परतफेड म्हणून भाजपच्या आशिष शेलारांसारख्या स्थानिक नेत्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले. पण त्यानंतरही सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरी व निवडणूक निशाणी चोरण्याच्या मुद्यावरून थेट शिंदेंवर घणाघात केला.
यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झालेत. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी अमित ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याप्रकरणी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्र भाजपचे नेते आघाडी धर्माचे पालन करत नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्या तक्रारीनंतर भाजपच्या नेत्यांचे सूर बदललेत. आता ते सदा सरवणकर हेच माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असल्याचा दावा करत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या प्रकरणी अन्य एखादा निर्णय झाला तर तो महायुतीच्या टॉप लिडरशीपकडून होईल, असे ते म्हणत आहेत. खासदार नारायण राणे यांनी यासंबंधी केलेले विधान या प्रकरणी अत्यंत सूचक मानले जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीविषयी आता आणखी एक नवी माहितीही उजेडात येत आहे. शिंदे गटाने अमित ठाकरे यांच्यापुढे माहीम ऐवजी भांडूप विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण राज ठाकरे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. अमित यांनी आपले निवासस्थान असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. या मोबदल्यात त्यांनी शेजारच्या शिवडी मतदारसंघातही भाजप व शिंदेंकडून पाठिंब्याची मागणी केली होती.