पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनास सहकार्य करणे सर्व पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रचार मोहिमेत कोणतेही नियमभंग होऊ नये म्हणून उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सभा, रॅली, पोस्टर-बॅनर लावणे यासारख्या सर्व कार्यक्रमांसाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि मतदारांमध्ये सुरक्षितता व विश्वास निर्माण व्हावा, यासाठी पोलिस प्रशासन देखील सतर्क आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक सुविधांचा वापर करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्याची तत्काळ नोंद घेण्यात येईल. उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे दडपशाहीचे किंवा अनुचित दबावाचे प्रकार न करता, कायद्याचे पालन करावे व निवडणूक निर्भयपणे पार पाडावी, असे डॉ. माने यांनी सूचित केले.
खडकवासला मतदारसंघातील प्रत्येक उमेदवार आणि मतदारांनी या निर्देशांचे पालन करून शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखावी, यासाठी निवडणूक कार्यालय आणि प्रशासनाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.