पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील एकुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून एकुण मतदार ५ लाख ३ हजार ५३९ झाले आहेत. तसेच, एकुण ४४३ मतदार केंद्रावर वेब कास्टींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार असून व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मतदार संघात पुरुष मतदार २ लाख ५९ हजार ४५३ तर महिला मतदार २ लाख ४३ हजार ९८४, ट्रान्सजेंडर मतदार १०२ आहेत. या मतदार संघातील शहरी भागीतील ४३७ तर ग्रामीण भागातील निरगुडी -१, वडगावशिंदे – २, मांजरी – ३ या ६ मतदान केद्रांवर वेब कास्टींगच्या सुविधा पुरविण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या कामकाजासाठी २ हजार ४५० अधिकारी, कर्मचारी एवढे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. मतदार संघात या निवडणुकीसाठी एकही संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश नाही. उपलब्ध मतदान केंद्रात वीज, पाणी, स्वच्छता आदीसह अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने मतदान केंद्राची पाहणी करण्यात आलेली आहे.
असे आहेत मतदान केंद्र…
शहरी भागातील ११ पत्राशेड व ५३ इमारतींच्या पार्किंगमध्ये मतदान केंद्र असणार आहेत. याबरोबरच विश्रांतवाडीतील कस्तुरबा हौसिंग सोसायटीत चार तर मुंढवा रस्त्यावरील सेंट क्रिसेंट या सोसायटीत दोन मतदान केंद्र असणार आहे. १४ केंद्र बदलण्यात आली आहेत. ३१ मतदारांसाठी १४ व १५ नोव्हेंबरला होम वोटींग घेण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने वय वर्ष ८५ च्या पुढील मतदारांचा समावेश आहे.