आमचे मत निळा झेंडा, आंबेडकरी विचारांना आणि स्वाभिमानाला !
पुणे –
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आमचे मत निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या विचारांना आहे. सन्मानपूर्वक वागणूक न देणाऱ्या महायुतीला मतदान करणार नाही, असा निर्धार पुणे शहरातील आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने आरपीआय (आठवले) पक्षाला एकही जागा न दिल्याच्या निषेधार्थ आरपीआय पुणे येथील पदाधिकाऱ्यांनी महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा घेतली. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना ही शपथ दिली.
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी ऍड. आय्युब शेख, आरपीआयच्या पुणे महापालिकेच्या माजी गटनेत्या फरजाना शेख, मौलाना कारी मोबशीर अहमद, हनुमंत गायकवाड, तानाजी गायकवाड, ईश्वर ओव्हाळ, विशाल बोर्डे, विजय कांबळे, गजानन जागडे , रविंद्र चाबुकस्वार , सोमनाथ नरवडे , निखिल कांबळे, रोहित कासारे, संदीप ससाणे, मिठू वाघमारे, विशाल घोक्षे, नितीन जगताप, शिलरत्न जगताप, समीर आगळे, ढेपे नाना , अशिष वानखेडे ,रजनी वाघमारे, कविता गाडगे, शीतल कांबळे, मालती धीवार, रवी चव्हाण, असिफ शेख, शेखर शेंडे आदीसह आरपीआयचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सुमारे २५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, महायुतीने आरपीआय पक्षाला सन्मानपूर्वक जागा देणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. राज्यात एकही जागा दिली नाही. याची खदखद सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या अनुयायांमध्ये आहे. त्यांची ही खदखद सातत्याने माझ्याकडे व्यक्त केली जात होती. त्यांचा प्रतिनिधी या नात्याने आज महायुतीला मतदान न करण्याची शपथ सर्वांनी घेतली आहे. ही खदखद आरपीआय पक्षासह पुणे शहरातील तसेच राज्यातील सर्व आंबेडकरी अनुयायांमध्ये आहे. ती उफाळून येत आहे. पुणे शहरातील अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात आहे.
ऍड. आय्युब शेख म्हणाले की, निवडणूक जवळ आली की मतदानासाठी आरपीआय पक्षाचा, दलित आणि मुस्लिमांचा वापर केला जातो. मतदान झाल्यानंतर मात्र या सर्वसामान्य घटकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा रोष आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. तसेच सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांना मानणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रतिज्ञा घेताना जातीयवादी शक्तींना सत्तेत बसू देणार नसल्याचा निर्धार सर्वांनी केला आहे.
मौलाना म्हणाले की, केवळ निवडणुकीत वापर केला जातो. देशाच्या हिताला बाधा होणारे निर्णय घेतले जातात. सध्याचे सत्ताधारी देश हिताला बाधा पोचेल असेच कृत्य करत आहेत. या निवडणुकीत देशाचा विचार करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
ही घेतली प्रतिज्ञा -सर्व आंबेडकरी विचारांच्या मतदारांना जाहीर आवाहन. आम्ही आंबेडकरी विचार चे भारतीय नागरिक प्रतिज्ञा करतो की, रिपब्लिक कार्यकर्ते व चळवळीला दुय्यम समजणाऱ्या व सन्मानाची वागणुक न देणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही व आमचे मत या वेळेस निळा झेंडा व आंबेडकरी विचारांच्याच पक्षाला देणार. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.
राज्यातील महायुतीच्या सरकारने आरपीआय पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांची खदखद त्यांचा प्रतिनिधी या नात्याने मी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाने तर एकही जागा दिली नाही. त्यामुळे आम्ही केवळ सतरंगी उचलायच्या का ? का असा संतप्त सवाल आंबेडकरी जनता उपस्थित करत आहे. आंबेडकरी विचारांचा अनुयायी या नात्याने महायुतीला मतदान न करण्याची प्रतिज्ञा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी दिली. तसेच महायुतीच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे मी पक्षाचा राजीनामा देऊन महायुतीचा निषेध व्यक्त केला आहे.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर.