पुणे, दि. ४: चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या खासगी वाहनाचे टायर जाळण्याचा केलेला प्रकार हा संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिगत ताण तणावामुळे घडल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
पोलीसांच्या प्राथमिक चौकशीनुसार विनायक सोपान ओव्हाळ (वय ४५ वर्षे) या दिव्यांग व्यक्तीने आज दुपारी ४.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या ब्रेझा वाहनाचे टायर जाळण्याचा प्रयत्न केल्याची नोंद झाली आहे. या घटनेमागचे कारण विधानसभा निवडणुकीशी संबंधित नाही. आरोपीने रमाई आवास घरकुल योजना आणि रसवंती दुकानासाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडे अनेकदा अर्ज केले होते. परंतु, महापालिका अधिकाऱ्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी त्याने आजचे हे कृत्य केले असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले आहे.
यापूर्वी याच व्यक्तीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी ध्वजारोहण समारंभाप्रसंगी महापालिका आयुक्तांच्या शासकीय वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. विनायक ओव्हाळ या व्यक्तीने विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्जही सादर केला आहे. पोलीस या व्यक्तीविरोधात कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करत आहेत.
0000