मुंबई-
सदा सरवणकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यास सांगितले होते. त्यानुसार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर आणि सहकारी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते. मात्र, राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सदा सरवणकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे, माझा मुलगा आणि सहकारी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी भेटायला गेले होते. पण राज ठाकरे यांनी आमची भेट नाकारली. सरवणकरांना भेटायचे नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असे राज ठाकरे म्हणाले असल्याचे सदा सरवणकरांनी सांगितले. त्यामुळे आता हा विषय संपला असून मी निवडणूक लढवणार आहे.
मी राज ठाकरेंसमोर एक नाही तर दोन्ही पुढे केले होते. पण, राज ठाकरे मला भेटत नसल्याने माझ्यासमोर दुसरा मार्ग नाही. मी महायुतीचा उमेदवार असून इतर पक्षांकडूनही महायुतीचे धर्माचे पालन केले जाईल, असा विश्वास सदा सरवणकरांनी व्यक्त केला.माहिम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे शिंदे गटाचे उमेदवार त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी महायुतीतील नेते प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. मात्र, मनसेने महायुती विरोधात दिलेले इतर उमेदवारांना मागे घ्यावे, तर मी देखील माघार घेण्यास तयार असल्याची भूमिका सरवणकर यांनी घेतली होती. जर मनसेचे इतर महायुतीविरोधातील उमेदवार माघार घेण्यास तयार असतील. तर एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी मी माघार घेण्यास तयार असल्याचे सरवणकर यांनी सकाळी सांगितले होते.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी उमेदवादी अर्ज माघारी न घेतल्यामुळे ते निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट आहे. आता अमित ठाकरे यांच्यासाठी विधानसभेचा मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे.