पुणे : दिवाळी पाडव्याची मंगलमय संध्याकाळ… तुतारीची ललकारी… सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर… आणि स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, पुणेकरांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी… जय शिवाजी.. हर हर महादेवचा… मर्दानी जयघोष… अशा शिवमय झालेल्या वातावरणात… तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्ट सहस्त्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वातील पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ स्मारकापाशी शिवजयंती महोत्सव समिती तर्फे सलग १३ व्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा साजरा झाला. यावेळी ८००० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.
श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन समितीच्या महिला सदस्या रिंकल अमित गायकवाड, ललिता रवींद्र कंक, विजया सागर पवार, दिपा किरण कंक, हेमलता राजाभाऊ बलकवडे, शोभा भोई, प्रतिक्षा विवेक तुपे, कामिनी प्रवीण गायकवाड, दिपाली विशाल गव्हाणे, जोत्स्ना निलेश जगताप यांसह उपस्थित महिलांच्या हस्ते तसेच समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, समीर जाधवराव, ईशान अमित गायकवाड आणि शिवकालीन स्वराज्यघराण्यांच्या वंशजांच्या व व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.
समितीच्या सदस्यांच्या हस्ते शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल श्रीमंत देवरावराजे हांडे, श्रीमंत भोईटे सरकार, श्रीमंत सरदार बाप्पुजी मांढरे ह्या स्वराज्यघराण्यांचा अखंड भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच राजे साळुंखे चालुक्य राजवंव, स्वराज्यनिष्ठ बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
अमित गायकवाड म्हणाले, दीपोत्सवाच्या पहिल्या तपपूर्तीच्या यशस्वी सांगता करुन नव तपपूर्तीचा पहिला दीपोत्सव साजरा करताना लक्ष लक्ष हत्तींचे बळ प्राप्त झाले आहे. शिवरायांचे जगातील हे पहिले भव्य अश्वारुढ स्मारक तसेच एकसंघ ओतीव काम केलेले एकमेव स्मारक आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या स्मारकाचे अनावरण झाले होते. स्मारकाने यंदा ९६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. स्मारकाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पणत्यांची दिवाळी पाडव्याला शिवरायांना पारंपरिक मानवंदना देणारा हा विश्वातील एकमेव भव्यदिव्य दीपोत्सव आहे.
समितीचे सचिव सचिन पायगुडे यांनी समितीच्या स्वराज्यकार्याचा गेल्या १२ वर्षाचा इतिहास तंतोतंत मांडून शिवशंभू भक्तां समोर जिवंत केला.दीपोत्सवाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक व समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, गोपी पवार, मोहन पासलकर, किरण शितोळे, निलेश जगताप, विशाल गव्हाणे, महेंद्र भोईटे, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले होते.