मुंबई-काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचीउचलबांगडी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाचा रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण झारखंड व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तेथील पोलिस महासंचालकांची बदली झाली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात एवढा विलंब का लागला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे, असे ते म्हणाले.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप होते. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची पोलिस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सोमवारी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
नाना पटोले म्हणाले, मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. झारखंड व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच लगेचच तेथील पोलिस महासंचालकांची बदली करण्यात आली होती. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी एवढा विलंब का लागला? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यापुढे निवडणुकीच्या कोणत्याही कामात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी.
रश्मी शुक्ला या स्पष्टपणे भाजपसाठीच काम करत होत्या. त्या विरोधकांचे फोन टॅप करत होत्या. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. राज्य सरकारने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांना या पदावर बसवले होते. आम्ही निवडणूक आयोगाने यासंबंधी एकदा नव्हे तर तिनदा तक्रार केली होती. त्यानंतरही सरकारने त्यांना दोन वर्षांची अवैध मुदतवाढ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचा दबाव असल्यामुळेच असे करण्यात आले.
नाना पटोले पुढे म्हणाले, पोलिस महासंचालक पदावर निष्पक्ष व्यक्ती बसला पाहिजे. कारण, हे पद राज्याच्या पोलिस विभागाचे महत्त्वाचे व प्रमुख पद आहे. रश्मी शुक्ला यांची या पदावर नियुक्ती झाली तेव्हापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली होती. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी. त्यांनी राज्यातील गुन्हेगारी संपवावी अशी आमची मागणी आहे.