मुंबई-राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप होते. त्यामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची पोलिस महासंचालक पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज सोमवारी निवडणूक आयोगाने त्यांच्या बदलीचे आदेश जारी केलेत.
एएनआयच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने काँग्रेस व इतर पक्षांच्या तक्रारींवर कारवाई करत महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तत्काळ प्रभावाने बदली करण्याचे आदेश दिलेत. आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना रश्मी शुक्ला यांचा पदभार तत्काळ सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिलेत. एवढेच नाही तर पोलिस महासंचालकपदी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत 3 आयपीएस अधिकाऱ्यांचे एक पॅनेल पाठवण्याची सूचनाही मुख्य सचिवांना करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वीच आपल्या आढावा बैठका व राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवेळी अधिकाऱ्यांना निवडणूक केवळ निष्पक्ष व तटस्थपणेच नव्हे तर आपल्या कर्तव्याचे पालन करतानाही योग्य व्यवहार करण्याचा इशारा दिला होता, असे वृत्तसंस्थेने सूत्रांचा दाखला देत म्हटले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांची बदली करण्याची मागणी केली होती.
रश्मी शुक्ला 2014 व 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत यांच्यासह काही विरोधकांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याविरोधात सरकारने पुणे व मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.
आघाडी सरकारच्या काळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बदल्यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्याच्या पुष्टर्थ तत्कालीन पोलिस महासंचालकांना बदल्यांमधील भ्रष्टाचारप्रकरणी आलेले पत्र फडणवीसांनी दिले होते. हे पत्र कथितरीत्या रश्मी शुक्ला यांनी लिहिल्याचे बोलले जात होते. फोन टॅपिंग प्रकरणात शुक्ला यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते.
1988 बॅचच्या आयपीएस केडरच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी यापूर्वी पुणे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूर पोलिस अधीक्षक आणि सोलापूरच्या पोलिस उपअधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. राज्य गुप्तचर विभागाचे (एसआयडी) आयुक्तपदही त्यांनी भूषवले. सशस्र सीमा दलाच्या पोलिस महासंचालकपदही त्यांनी भूषवले आहे.