अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दर दोन वर्षांनी बदल घडत आहेत. तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून डॉ. संजय गांधी यांनी लिहिलेले आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित आकांक्षा नव्या युगाच्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री दादा इदाते, डी. आय. सी. सी.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, आय. आय. आय. टी. अलाहाबादचे संचालक प्रा. मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे अशुतोष रामगिर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुस्तकाचे शब्दांकनकर्ते प्रसाद मिरासदार, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सच्या संचालक समीधा गांधी, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे मंचावर होते.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, डॉ. संजय गांधी यांनी विकासाची त्रिसूत्री मांडताना शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा आढावा पुस्तकामार्फत युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्ननिर्मितीवर भर देताना डॉ. संजय गांधी यांनी पाच आरची तत्त्वे मांडली आहेत, ज्यात रिड्युस, रियुज, रिफ्यूज, रिपेअर आणि रिसायकल यांचा विचार केला आहे. त्या बरोबरीनेच आजच्या तांत्रिक युगात रिकॉन्फिगर या सहाव्या आरचाही समावेश व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुरुवातीस डॉ. संजय गांधी यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. युवा पिढीने रोजगारक्षम होऊन शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्यरत व्हावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे समीधा गांधी म्हणाल्या.
पद्मश्री दादा इदाते म्हणाले, नाविन्य, धडपड, येणाऱ्या पिढीविषयी आस्था, सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, रोजगार, उद्योजकता या विषयी समाजजीवनात नविन इतिहास घडविणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. संजय गांधी होत. आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक संभ्रमित युवा पिढीला, त्यांच्या स्पदंनांना साद घालणारे ठरेल.
पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, या पुस्तकाच्या निर्मितीने साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. हे साहित्य भविष्याचे वेध घेणारे आहे. युवा पिढीच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांना जागृत करणारी त्रिसूत्रीची मांडणी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रसाद मिरासदार यांनी पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली. युवा पिढीने या प्रेरणादायी पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संजय गांधी, समीधा गांधी, सुनील महाजन यांनी केले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत हुनर गुरुकुल, असीम फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन तसेच रिलायन्स ग्रुपचा सन्मान पद्मश्री दादा इदाते आणि पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार निकिता मोघे यांनी मानले.