पुणे : दिवाळी म्हटलं कि लहान मुलांची लगबग सुरु होते ती किल्ले बनविण्यासाठी. दिवाळीत किल्ले तयार करणं हि महाराष्ट्रातील मुलांची परंपराच. यानिमित्ताने सर्व मुले एकत्र येऊन मातीच्या सुंदर कलाकृती साकारतात. मुलांच्या या कलागुणांचा विचार करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित केली. या स्पर्धेला बच्चे कंपनीचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
चंद्रकांत पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती देताना म्हटले कि, आजच्या तरुणाईमध्ये संघभावना तसेच संस्कृती जपण्याची ओढ निर्माण व्हावी या हेतूने दिवाळीमध्ये ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी शिवनेरी, तोरणा, रायगड, राजगड, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड अशा विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून साकारल्या. या निमित्ताने मोबाइलच्या विश्वात हरवलेलं बालपण बच्चे कंपनीला अनुभवता आलं, याचा विशेष आनंद असल्याचे पाटील यांनी म्हटले.
बालवयात किल्ले बनविणाऱ्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये दरवर्षी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करतात. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवचरित्राच्या प्रति भेट दिल्या जातात ज्या लहान मुलांमध्ये शिवरायांच्या स्फूर्ती जागवतात आणि शिवरायांची प्रेरणा मिळवून देतात. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यास नक्कीच मदत होईल हे निश्चित.