पुणे-व्यावसायिक आेळख झालेल्या एका सहकाऱ्याने भागीदारीत गुरुकृपा स्पेशालिस्ट फिल्मस हा व्यवसाय सुरू करण्याचे सांगत एकास २ कोटी ३१ लाख रुपयांना गंडा घातला. व्यवसाय ताेट्यात जाऊन कंपनीसाठी खरेदी केलेली चार ते साडेचार काेटीची साधने भागीदाराने स्वत:कडे घेत त्याची परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.चार काेटी ८३ लाख २३ हजार रुपयांची तक्रारदार यांची आर्थिक फसवणुक केल्याचा अर्ज पोलिसांकडे आला. याबाबत गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने प्राथमिक चाैकशी केली असता, तक्रारदार यांचे दाेन काेटी ३१ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
हा प्रकार सन २०१९ ते ३१ /१०/२०२४ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चारुदत्त श्रीनिवास मुदगल (५८,रा.डेक्कन जिमखाना,पुणे) यांनी आराेपी नीलेश सुरेश ठाेले व रिना निलेश ठाेले यांच्याविराेधात फिर्याद दाखल केली आहे. आराेपी व तक्रारदार यांची व्यवसायातून आेळख झाली. तक्रारदर हे आराेपीस मागील १५ वर्षापासून मटेरियल सप्लाय करत असून आराेपींनी भागीदारीत गुरुकृपा स्पेशालिटी फिल्मस हा व्यवसाय सुरू केला. तक्रारदाराने माहिती घेतली असता आराेपीने स्वत:च्या संबंधित खात्यात ही रक्कम वळवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास सुरू केला आहे. तसेच यात कोण कोण गुंतले आहेत हे देखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात पैसे अडकल्याचेही अनेकांनी तक्रारीत म्हटले आहे.