पुणे : पुण्यामधून ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना पकडून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Hemant Patil) आणि बिटकॉइन घोटाळा प्रकरणाचा उल्लेखनीय तपास करणारे पुणे सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण (Ankush Chintaman) या दोन्ही अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. राज्य पोलीस दलातील अकरा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले आहे. पाटील सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत राबोडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
१८ जुलै २०२४ रोजी गस्तीदरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत ‘अह उल सुफा’ या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी पकडले होते. त्यानंतर, देशभरातील २६/११ प्रमाणे हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तब्बल दहा लाखांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला होता. पोलीस शिपाई अमोल नजन, प्रदीप चव्हाण, पोलीस हवालदार बालारफी शेख, पोलीस अंमलदार अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ तसेच वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी ही कामगिरी केली होती. ‘पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे पुणे ‘इसिस मॉड्युल’ उघडकीस आले. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची ठरली. पुढे हा तपास एटीएस आणि नंतर एनआयएकडे सुपूर्द करण्यात आला. एनआयएनकडून याचा सखोल तपास करीत एक एक कडी उलगडत नेली. या तपासात आयसीसचे महाराष्ट्र मोड्यूल उघडकीस आले. या कारवाईमुळे देशावरचे मोठे संकट टळले.
दिल्ली येथे राहणाऱ्या भारद्वाज बंधूंनी २०१६-१७ मध्ये केलेल्या बिटकॉइन घोटाळ्याचा चिंतामण यांनी तपास केला होता. आरोपींनी बीटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. अनेक गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी एजंटांचे जाळे तयार करीत देशभरातून लाखो बिटकॉइन गुंतवणूक स्वरूपात उकळले. कोणताही परतावाही न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. पुणे शहरात २०१८ मध्ये निगडी आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास निरीक्षक चिंतामण यांनी केला होता.