पुणे : सुमारे 130 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे पुणेकर रसिकांच्या आग्रहास्तव दि. 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या तीन दर्जेदार संगीत नाट्यकृती रसिकांना पाहायला मिळणार आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचे यंदाचे पहिले वर्ष आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे दरवर्षी मे महिन्यात वासंतिक नाट्य महोत्सव आयोजित करण्यात येतो. या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. वासंतिक नाट्य महोत्सवाव्यतिरिक्त आणखी एक महोत्सव आयोजित केला जावा, अशी रसिकांनी सातत्याने मागणी केल्यामुळे दिवाळीचे निमित्त साधून संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
मंगळवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेत्री, विदुषी निर्मला गोगटे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार असून त्यानंतर विद्याधर गोखले लिखित संगीत स्वरसम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र आणि गुरुवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. दिग्दर्शन रवींद्र खरे यांचे आहे. तीनही दिवस प्रयोगाची वेळ सायंकाळी 5:30 अशी आहे.
डॉ. चारुदत्त आफळे, डॉ. राम साठ्ये, वज्रांग आफळे, चारुलता पाटणकर, श्रद्धा सबनीस, अपर्णा पेंडेसे, तनुश्री सोवनी, भक्ती जोशी, विश्वास पांगारकर, सुधीर फडतरे, दीपक दंडवते, राजन कुलकर्णी, संजय डोळे, प्रदीप रत्नपारखे, अभय जबडे यांच्या भूमिका आहेत. राहुल गोळे, संजय गोगटे, प्रसाद करंबेळकर, संजय करंदीकर, मुकुंद कोंडे साथसंगत करणार आहेत.
नाट्य महोत्सवाच्या तिकिट विक्रीला भरत नाट्य मंदिर येथे सुरुवात झाली असून तिकिट दर 300 रुपये आहे.
बंगलोर येथे ‘मानापमान’चा प्रयोग
बंगलोर येथील रंगशंकरा संस्थेने भरत नाट्य मंदिरास संगीत नाटक सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण दिले असून संस्थेतर्फे दि. 10 नाव्हेंबर रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.