विघ्नहर्ता पथकातर्फे ९५० किलो धान्य व शिधा संस्थांना सुपूर्द ; विनामूल्य वादन करुन जमा केला शिधा
पुणे : विविध मंडळे, कार्यक्रमात ढोल-ताशा वादन करुन नवरात्रोत्सवात जमा केलेला धान्यरुपी जोगवा दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक संस्थांना देऊन विघ्नहर्ता ढोल-ताशा पथकाने वंचितांची दिवाळी गोड केली. भोर वेळवंड येथील समर्थ विद्या प्रसारक मंडळी, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या सामाजिक संस्थांना हा धान्यरूपी जोगवा देण्यात आला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ गणेश मंदिरासमोर शिधा प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रचे अध्यक्ष पराग ठाकूर, खडक पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अभिजित पवार, कुमार रेणुसे, शिरीष मोहिते, महेश जगताप, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, उमेश कांबळे आदी उपस्थित होते.
तब्बल ९५० किलो धान्य संस्थांना देण्यात आले. पथकाचे अॅड.वृषाली जाधव- मोहिते, विराज मोहिते, गौरव देवकर, सौ विद्या मोहिते, सचिन गायकवाड, निधी पोटे, उमेश चंद्रगी, सार्थक कामठे,अश्वजीत अष्टिगे , सिद्धेश्वर दळवी , रोहन भिल्लरकर आदींनी संयोजनात सहभाग घेतला.
पराग ठाकूर म्हणाले, वादन ही गणपती बाप्पाची सेवा आहे. पूर्णब्रह्म असलेल्या अन्नाचा जोगवा मागत धान्य व शिधा जमा करण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. वादन करुन पैसे मिळू शकतात, मात्र अन्न-धान्य मिळवून ते समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे. हे काम विघ्नहर्ता पथकाकडून केले जात आहे.
प्रास्ताविकात अॅड. वृषाली जाधव मोहिते म्हणाल्या, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. समाजात अशा अनेक संस्था आहेत, ज्या चांगले काम करीत आहेत. त्यांना आपण मदतीचा हात द्यायला हवा. यंदा धान्य व शिधा अंतर्गत गहू, तांदूळ रवा, पोहे, शेंगदाणे , डाळी इत्यादी प्रकारचे धान्य तसेच तेल, साखर, चहा पावडर, मसाले, बिस्किटे, कांदे, बटाटे, केळी यांचा देखील समावेश होता.