मुंबई- महायुती – महाविकास आघाडीत यंदा बंडखोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या बंडखोरांची समजूत काढून ४ नोव्हेंबरपर्यंत त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावण्यासाठी नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर प्रमुख नेते नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. भाजपने सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ६ नेत्यांवर विभागनिहाय मन वळण्याची जबाबदारी सोपवली आहे. ४ तारखेपर्यंत हे उमेदवार माघार घेतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
कालपर्यंत नेत्यांच्या घराचे उंबरे झिजवणाऱ्या बंडोबांना आता पहिल्या दिवाळीत नव्या जावयाला मिळतो तसा पाहुणचार मिळू लागलाय. शिर्डीतील बंडोबाला आणण्यासाठी भाजप श्रेष्ठींनी चक्क चार्टर्ड विमान पाठवावं लागलं. पण त्याने मुंबईत जाऊनही ‘श्रद्धा व सबुरी’चाच मंत्र दिला. इकडे ‘यू टर्न’फेम राजसाहेबांनी स्वबळाचा नाद सोडून ‘कमळ’ हाती घेण्याचे संकेत दिलेत. त्यांनाही ‘इंजिन’ सत्तेच्या यार्डात लावायचंय ना. पण माहीममध्ये ‘राज’पुत्राच्या विजयाचे कोडे क्लिष्ट बनलेय. ज्या सरवणकरांवर ‘सदा’ दबाव टाकला जातोय त्यांनीच आज बाळासाहेबांची आठवण करून देत राज यांच्या डोळ्यात अंजन घातलंय.मात्र आता याच सदाभाऊ ना विधानपरिषदेचे गाजर दाखविले जाऊ लागले आहे.
शिर्डीतून भाजपने मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना उमेदवारी दिली. मात्र पक्षाचे नेते राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजप नेत्यांनी बुधवारी विशेष चार्टर्ड विमान पाठवून त्यांना सपत्नीक मुंबईत नेले. ‘पक्षनेतृत्वाने चर्चेस बोलावल्याने आपण गेलो. मात्र अद्याप निर्णय झाला नाही,’ असे पिपाडा यांनी सांगितले. यापूर्वी कोपरगावात उमेदवारीवर अडून बसलेल्या माजी आ. स्नेहलता कोल्हे यांना थेट दिल्लीत नेऊत अमित शाह यांची भेट घालून देत नाराजी दूर केली होती.

