सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टीहिन विद्यार्थीनींकरीता अनोखा उपक्रम
पुणे : सृष्टीचे निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी पाहता येत नाही तरीही फुले, पाने, अंगावर पडत असलेले पाणी आणि पक्षांचा किलबिलाट ऐकत त्यांनी निसर्ग सौंदर्याची उधळण प्रत्यक्ष अनुभवली. तसेच, कांदा भजी, पिठलं-भाकरी, साजूक तुपातला शिरा या गावरान मेनूवर देखील विद्यार्थिनींनी ताव मारला. त्यासोबतच बनेश्वर येथील मंदिरात मुलींनी दर्शन घेत आरती देखील केली.

निमित्त होते, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दृष्टीहीन विद्यार्थीनींसाठी आयोजित वेल्हे तालुक्यात आयोजित सहलीचे. कोथरूड येथील पुणे अंध मुलींची शाळा, वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था, न-हे येथील साई गुरु सेवा संस्था या संस्थांमधील दीडशे मुलींनी या वर्षात सहलीत सहभाग घेतला. उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, सचिन ससाणे, विक्रम मोहिते, सुरेश तरलगट्टी, अनुप थोपटे, कुणाल जाधव, प्रद्युम्न पंडित यांनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
शिरीष मोहिते म्हणाले, गणेशोत्सव व नवरात्रीनंतर सगळ्या लहान मुलांना सहलीचे वेध लागतात. त्यामुळे अशा सहलीचा आनंद दृष्टिहीन मुलींनाही घेता यावा, याकरीता हे आयोजन केले जाते. सहलीचा मनसोक्त आनंद विद्यार्थीनी घेतात, त्यामुळे दरवर्षी या सहलीला येण्यास त्या उत्सुक असतात. या दृष्टीहीन मुलींना आनंद देण्यातच कार्यकर्त्यांना आनंद व उर्जा मिळत असते. यंदा देखील ताई-दादांसोबत गप्पा मारत बसमध्ये बसून गाण्यांच्या भेंडयांमध्ये देखील विद्यार्थीनींनी उत्साहाने सहभाग घेतला. तर दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा सहलीला न्याल ना? असा गोड हट्टही मंडळातील ताई-दादांकडे केला.

