जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षकांकडून जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
पुणे, दि. ३०: पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने सुक्ष्म नियोजन केले असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची खबरदारी सर्व मतदारसंघात घेण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निरीक्षक (जनरल) आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत डॉ. दिवसे बोलत होते. यावेळी निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह यांच्यासह निवडणूक निरीक्षक नाझिम खान, मनवेश सिंह सिद्दु, के. हिमावती, निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मिना, अमित कुमार, उमेश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, पुणे आणि पिंपरी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, विविध कक्षांचे समन्वय अधिकारी उपस्थित होते. तर पुणे ग्रामीणमधील सर्व विधानसभांचे निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात असलेल्या सर्व २१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनाने नियोजन केले असून निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीची माहिती डॉ. दिवसे यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, निवडणूक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली असून मतमोजणीच्या ठिकाणीदेखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था राहिल यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे. मतदान यंत्रांची सरमिसळ नियोजित वेळापत्रकानुसार पार पाडली जात आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. मतदान जागृती उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक ती सर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे विशेष मतदान केंद्रेदेखील स्थापित केली जाणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रासाठी आवश्यक उपाययोजना आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचनादेखील सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांची मतमोजणी शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा स्तरामध्ये होणार असून भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी या ठिकाणी तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवनमध्ये होणार आहे. पर्वती, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, हडपसर, पुणे कॅन्टोंन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम येथे होणार आहे. तर ग्रामीण भागातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय त्या भागात होईल, अशी माहिती डॉ. दिवसे यांनी यावेळी दिली.
वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे-डॉ. दिवसे
यानंतर पार पडलेल्या अंमलबजावणी यंत्रणा संदर्भातील बैठकीत माहिती देतांना डॉ. दिवसे म्हणाले, उमेदवारांचा निवडणूक खर्च योग्य पद्धतीने नोंदविला जाईल यावर लक्ष देण्यासह निवडणूक खर्चाची पडताळणी करावी. नियमाप्रमाणे वेळोवेळी निवडणूक खर्चाचे परीक्षण करावे. मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणीदेखील सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने वेळोवेळी आढावा घेऊन पूर्वतयारी करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने जिल्ह्यात परवानाधारक शस्त्र जमा केली आहेत. त्यांची यादी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय निवडणूक निरीक्षकांना देण्यात यावी. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सी-व्हीजील, खर्च, माध्यम संनियंत्रण समिती यांच्यासह इतर अहवाल वेळोवेळी द्यावेत, आदी सूचना यावेळी डॉ. दिवसे यांनी दिल्या.
निवडणुकीत रोकड, मद्य तसेच इतर कोणत्याही स्वरुपातील आमिषांचा वापर होऊ नये यासाठी तपासणी नाक्यांवर तसेच भरारी पथकांद्वारे जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. अवैध मद्य वाहतूक व विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्तीसह कठोर कारवाई करावी, अशाही सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.
यावेळी निवडणूक प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजन आणि कामकाजाबद्दल निवडणूक निरीक्षक मनवेश सिंह सिद्दु यांनी निवडणूक प्रशासनाचे कौतुक केले.
यावेळी पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकांत महावरकर, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आयकर विभागाचे आयुक्त जयेश आहेर, वस्तु व सेवा कर अतिरिक्त आयुक्त एम.एस. पन्हाळकर, पुणे प्रधान टपाल कार्यालयाचे अधीक्षक सुकदेव मोरे, मुख्य वनसंरक्षक राम धोत्रे आदी उपस्थित होते. परवानाप्राप्त शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, मद्य, रोकड जप्तीची कारवाई, कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्ताबाबत यावेळी निवडणूक निरीक्षकांना दिली.