ओबीसीतून आरक्षणाचा अट्टहास का करता?
भिवंडी-मी छगन भुजबळांचा कार्यक्रम करणार अशी धमकी काय देतो जरांगे. जे-जे ओबीसीविरोधात बोलतात त्यांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा, ठिकठिकाणी मोर्चे काढा, कॅंडल मार्च काढा. लढाईसाठी सज्ज व्हा. असे आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजबांधवांना केले. भिवंडी येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जहरी टीका केली.भुजबळ म्हणाले, कुणीतरी जरांगेला जाऊ सांगा की, दादागिरी करणे चूक आहे. जाळपोळ करणं चुकीचं आहे, गुन्हे मागे घ्या, असा दबाव टाकणे चूक आहे. सरकारला इशारा देणे चुकीचे आहे. कुणीतरी याला सांगा की, तुझी तब्येत सांभाळ, बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडण्या आधी सांभाळ, असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.भुजबळ पुढे म्हणाले की, ‘आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला’ असा उल्लेख करत त्यांनी जरांगेंवर पुन्हा निशाणा साधला. माझा कार्यक्रम करणार, 24 तारखेनंतर बघू, अश्या धमक्या चालणार नाही. महाराष्ट्रात अजिबात दादागिरी चालणार नाही.भुजबळ पुढे म्हणाले की, आमची लायकी काढता अन् ओबीसीमधून आरक्षण मागत आहात. एकीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात याचिका टाकून आम्हाला ओबीसीतून हाकलून लावत आहे. तर दुसरीकडे दादागिरी करून बळजबरी ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत. जस्टीस शिंदे समिती एकप्रकारे चुकीचे काम करु लागली आहे. आमची मुलं हुशार आहेत. त्यामुळे त्यांना सगळं मिळत आहे. त्यांच्या कतृत्वाने ते मिळवत आहेत.आज काल काय चाललंय छत्रपती शिवाजी, महाराज की जय म्हणायचे आणि आमच्यावर हल्ले करायचे. छत्रपतींचा इतिहास हा मावळे म्हणून लिहला जातोय मराठा म्हणून केला जात नाही. मावळ्यांमध्ये सर्वच होते. मांग, माळी, महार, न्हावी, कोळी, मुस्लिम या समाजातील अनेक लोकांनी महाराजांना साथ दिली. आमचं म्हणणे एवढंच आहे. सारथीला देता ते आम्हाला द्या, 54 टक्के म्हटले तर साडे सात कोटी लोक हे ओबीसी आहेत. काहीही करायचं आणि काहीही बोलायचं. मराठा समाजाला आरक्षण द्या पण खोटी प्रमाणपत्र घेतली त्यात बाजूला काढून टाका.

