आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन चा दिवाळी कार्यक्रम
पुणे:आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन(एईएसए) कडून ‘अलंकृता’ या संगीतमय दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (कर्वेनगर) च्या सभागृहात करण्यात आले होते.ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ.रेवा नातू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अप्रतिम कार्यक्रम सादर केला.ज्येष्ठ आर्किटेक्ट डॉ.अभिजीत नातू तसेच आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशनचे चेअरमन आर्किटेक्ट महेश बांगड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.
कला, अलंकार आणि संस्कृती चा आविष्कार या कार्यक्रमात झाला. सुरेल गीत रचनांच्या लडीमधून दागिन्यांची कहाणी ‘अलंकृता ‘ मधून उलगडली.अलंकार हा परंपरेने नावीन्याकडे सोपवलेला वारसा मैफलीतून पुढे आला.
राजस सुकुमार,बिंदिया ले गयी हमार ये मछलिया,नथ ही सजली, नथनिया ने बडा दुख दिना,मुंदरी मोरी काहेको छीन रहे,बिल्वर अंगठी तोडे हा मराठी गोंधळ,मंगलाष्टक, रेणुका स्तोत्र अशा अलंकृत रचनांना डॉ.रेवा नातू यांनी अप्रतिम स्वरसाज चढविला.
निवेदन आणि गायनातून उलगडणाऱ्या अलंकृताला पीएनजी(सांगली )च्या दागिन्यांच्या छायाचित्र प्रक्षेपणाने आगळी उंची प्राप्त झाली. भरतमुनीपासून, संत साहित्यापासून लोकसाहित्य, काव्य शास्त्र विनोदातून अलंकारांचे अलवार रंग सजून या मैफलीत आले. उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.स्त्री धन असलेल्या दागिन्यांच्या प्रकारांची गर्भश्रीमंती या कार्यक्रमातून समोर आली.अलंकार हा परंपरेने नावीन्याकडे सोपवलेला वारसा पुढे आला.
डॉ.मृणाल घोंगडे, मंजुषा उकीडवे यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. त्यातून दागिन्यांचा इतिहास आणि मनोरंजक नोंदी उलगडल्या.राजीव राजे यांनी प्रास्ताविक केले. आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन(एईएसए) चे संजय तासगावकर,जयंत पटवर्धन,जयंत इनामदार, निनाद जोग,दिवाकर निमकर,पुष्कर कानविंदे,पराग लकडे हे पदाधिकारी उपस्थित होते. ईशा उमराणी यांनी परिचय करून दिला.
उमेश पुरोहित,अक्षय शेवडे,प्रज्ञा देसाई,तुषार दीक्षित,हेमंत पोटफोडे,सारिका सोमण,सानिका जोगळेकर,मधुरा भिडे, पायल वाळके,अनुजा महाजन यांनी अनुरूप साथसंगत केली.