कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट, पुणे तर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : केवळ धार्मिक कार्यापुरते मंदिर मर्यादित न ठेवता, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य संस्थांद्वारे केले जात आहे. आपण सामाजिक दायित्वाच्या मार्गावर चाललो, तर खूप काही करु शकतो. देण्याची वृत्ती ही समाजाला समृद्धी व संपनतेकडे घेऊन जाते. समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रत्येकाने पूर्ण केली तर माणूस म्हणून जगताना आनंद मिळू शकतो. असेच कार्य कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट सारख्या संस्था करीत आहेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती डॉ.शालिनी फणसळकर-जोशी यांनी व्यक्त केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्षी देण्यात येणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ.माधवी वैद्य, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, खजिनदार अॅड.रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे उपस्थित होते.
प. पू. श्री कलावती आईंचे अध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील व खेळाडू रेश्मा पुणेकर यांना प्रदान करण्यात आला. दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, रुपये २५ हजार रुपये सन्मानराशी, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. परमार्थ निकेतन चा पुरस्कार संस्थेतर्फे प्रमुख विश्वस्त चैतन्यदादा मल्लापूरकर यांनी स्विकारला.
परमार्थ निकेतन व अर्चना मोरे यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम पुन्हा ट्रस्टच्या सामाजिक कार्याकरिता दिली. पुरस्कारार्थींनी त्यांच्या खडतर वाटचालीत खंबीर पाठबळ देणारे रेश्माचे वडील शिवाजी पुणेकर व मार्गदर्शक संतोष तांबे तसेच अर्चनाच्या आई व लता मोरे यांचाही सन्मान ट्रस्टतर्फे करण्यात आला.
डॉ.माधवी वैद्य म्हणाल्या, स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. स्त्रिया आपल्या बौद्धिक सक्षमतेप्रमाणे सर्व क्षेत्रात लखलखत आहेत. आपले जीवन सफल करायचे असेल, तर आहार, विहार आणि विश्रांती ही तीन सूत्रे महत्वाची आहेत. आहारामध्ये शारिरीकतेसोबतच मानसिक आहार देखील गरजेचा आहे. आता स्त्रियांनी स्वत:ला अबला नाही, तर सबला समजायला हवे.
पुरस्काराला उत्तर देताना चैतन्य दादा मल्लापूरकर म्हणाले, प.पू.कलावती आईंनी सन १९४२ साली हरिमंदिर येथून उपासनेला प्रारंभ केला. आज महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे १२०० हून अधिक शाखा कार्यरत आहेत. आईंनी सर्वांना उपासनेचा मार्ग घालून दिला. त्यानुसार सर्वच जण सेवारुपाने येथे कार्य करतात, असे सांगत प.पू.कलावती आई आणि परामार्थ निकेतनचे कार्य सांगण्यात आले.
रेश्मा पुणेकर म्हणाल्या, प्रत्येकाची परिस्थिती सामान्यच असते. मात्र, आई, वडिल, प्रशिक्षक आणि सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो. मी देखील या सर्वांच्या पाठिंब्यामुळे क्रीडा क्षेत्रात यश मिळवू शकले. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सातत्य टिकविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. अर्चना मोरे म्हणाल्या, गुन्हे क्षेत्रात पत्रकारिता करताना अनेक प्रकारे दबाव येत असतो. पण आपण सत्य घटेनेचे वार्तांकन केले व सचोटीने काम केले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायला मदत होईल. आपण केलेले काम हीच कालंतराने आयुष्यभराची ओळख होऊन जाते.
राजेंद्र बलकवडे यांनी स्वागत केले. डॉ.पराग काळकर यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले.

