नाशिक-पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) मुख्य सचिव असल्याचे भासवत नाशिक मध्यच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदेंसह तिघा इच्छुक उमेदवारांशी संपर्क साधून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दिल्लीतील दोन तोतये सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा ऊर्फ दिनू सुरेंद्र मिश्रा (रा. गाझियाबाद) व गौरव बहादूर सिंग नाथ (रा. दिल्ली) यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही उच्चशिक्षित असून मिश्रा बीएस्सी आहे, तर नाथ बीएच्या दुसऱ्या वर्षाला दिल्लीमधील मयूर विहार येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो.संशयित दोघांनी जिल्ह्यातील व शहरात एका मतदार संघातील आमदाराचे पती आणि एक विद्यामान आमदार, देवळा मतदार संघातील इच्छुकासह अहिल्या नगर, डोंबिवली, कल्याण, पुणे, येथील एका इच्छुकांनाही अशाच प्रकारे दूरध्वनी करून खंडणीची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आमदार देवयानी फरांदे यांना ६ ऑक्टाेबर रोजी फोन आला. समोरील व्यक्तीने प्रमोद मिश्रा असे नाव सांगत नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचे सांगितले. विधानसभेच्या तिकीट वाटपात तुमचे नाव नाही. तुम्हाला तिकीट पाहिजे असल्यास पार्टी फंड म्हणून ५० लाखरुपये द्यावे लागतील. यासाठी पुरावा म्हणून फाेनवरच पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे नावाचे पत्र वाचून दाखवत नाशिकसह राज्यातील इतर मतदार संघातील इच्छुकांचे तिकिट रद्द केल्याचे सांगितले. तुमची उमेदवारी कायम ठेवायची असल्यास तातडीने ५० लाख फंड द्यावाच लागेल असे सांगत हा निधी दिला नाही तर राज्यात बदनामी करण्याची धमकी देखील दिली.
दरम्यान,आमदार फरांदे यांनी हा प्रकार आयुक्तांकडे कथन केला. त्यानुसार तत्काळ तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला. दिल्ली स्पेशल सेलच्या पथकाने गौरव नाथ यास पूर्वीच पकडले होते. पथकाने या दोघांचा ताबा घेत त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आले. दाेघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवस म्हणजे दि. २८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.