पैलवान कटके यांच्यावरील इन्कम टॅक्स रेडने निश्चित अन्य बंडखोरांना चाप बसला असेल…पण या रेड चे परिणाम मतदानात दिसणार नाहीतच असा दावा कोणी करू शकणार नाही.विरोधात जाणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा चेहरा पुण्यातून सामान्य कार्यकर्त्याला हि दिसल्याने तो आता हबकला आहे.भले तो राहील पक्षात,पण पक्षाचे काम मनापासून करेल कि वरवर दिसण्या पुरते करेल हा खरा प्रश्न आहे. इच्छुक असले तरी डोक्यात हवा कोणी भरल्याने अमोल बालवडकर यांनी चंद्रकांतदादांना ज्या शब्दात आव्हान द्यायला नको होते त्या शब्दात दिले…बालवडकर चुकलेच ..पण ते चुकले म्हणून पक्षाने आणखी मोठी चूक करायची काय ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला तर नवल वाटणार नाही. एकूणच कोथरूड मधील विधानसभेचे इच्छुक उमेदवार माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी नगरसेवक पदाच्या काळात काहीच काम केले नाही आणि त्यांचा जन संपर्कच नाही असाही दावा कोणी करू शकणार नाही.आणि ते शांत बसले.एवढेच नव्हे तर राजकारणातून जरी बाहेर पडले तरी या इन्कम टॅक्स रेडचा विचार कार्यकर्ता आणि मतदार या दोहोंच्या स्तरावर झाल्याशिवाय राहणार नाही.
पुणे- कोथरूड तसा भाजपचा बालेकिल्ला,गेल्या विधानसभेला अगदी मुरलीधर मोहोळ,मेधा कुलकर्णी सारख्या नेत्यांना डावलून इथे पक्ष श्रेष्ठींनी कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांना उमेदवारी दिली. रुसत फुगत का होईना काहींनी दादांचे तेव्हाही काम केले आणि काहींनी तेव्हा तर केले पण ५ वर्षे हिरारीने दादांची सोबत करत त्यांना कणखर साथ दिली.आणि दादा पुणेकरच नाही तर कोथरुडकर देखील बनले. पण दुर्दैवाने आज त्यातील कितीजण चंद्रकांत पाटलांच्या बरोबर होते त्याच उत्साहात आहेत ? असा प्रश्न विचारावा लागेल. कोथरूड मधून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी मिळणार होती हे निश्चितच होते.मोहोळ यांना महापालिकेतील ५ हि वर्षे स्थायी समिती आणि महापौर पदावर सत्ता गाजविता आली त्यानंतर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना राज्यसभा देण्यात आली. पुन्हा मोहोळ यांना लोकसभा देऊन त्यांनाही खासदारकी आणि केंद्रात मंत्रीपद दिले गेले.मोहोळ यांची झपाट्याने झालेली प्रगती पाहून अनेक नगरसेवकांच्या आशा पल्लवित होणे यात नवल कसले ? त्या प्रमाणे अनेकांनी मोहोळ यांना मंत्रीपद मिळाल्यावर आपल्याला विधान परिषद मिळावी, विधानसभा मिळावी म्हणून प्रयत्न केले पण भाजपकडे मोजक्या जागा होत्या.आणि विद्यामानानी त्या अगोदरच अडवून ठेवल्या होत्या या पार्श्वभूमीवर आता आम्हालाही संधी द्या म्हणून हटवादी भूमिका कोणी घेणे यातही फारसे नवल नाही पण त्यांना सांभाळणे,योग्य पद्धतीने प्रवाहात घेऊन समजूत काढणे न प्रदेशाध्यक्षांना जमले ना खुद्द चंद्रकांत पाटलांना जमले.आणि मग आयकर विभागाने मारली रेड…
इथे आणखी मोठी चूक झाली,स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि विद्यामानाना आव्हान देणाऱ्यांना हा मोठा इशारा जरी ठरला. तरी याच इशाऱ्याने कार्यकर्त्याची पक्षावरील श्रद्धा आणि निष्ठा आता ढळू लागली आहे. एवढेच नव्हे तर पक्षाच्या मतदारांनाही हि बाब फारशी आवडणारी नाही.आणि म्हणूनच पुण्यात या निवडणुकीत इन्कम टॅक्स रेड ने भाजपा बॅकफुट वर..गेली तर नवल वाटणार नाही. आता मतदान होईपर्यंत तसा पक्षाला वेळ आहेच.मतदानापूर्वीच पैलवान कटके यांच्या आयकर कारवाईची तपशील जो असेल तो जाहीर करणे मतदारांच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे अन्यथा हि निव्वळ झाकी होती असे मानयला कोणी नाही म्हणार नाही आणि बालवडकर आणि त्यांच्यासारखे अन्य इच्छुक यांचे पुनर्वसन करत त्यांची समजूत काढणे हेही पक्षापुढे आव्हान असणार आहेच.ठराविक व्यक्तींना सारे काही आणि काहींना वर्षानवर्षे काहीच नाही,आणि आवाज उठवला तर कारवाई हि पक्षाची होत चाललेली प्रतिमा या निवडणुकीत पक्षाला हानिकारक ठरू शकते याचा विचार नेत्यांनी केलेला नसावाहे आश्चर्यकारक आहे.

