मुंबई- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ते मागील 2 वर्षांपासून तुरुंगात होते. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सचिन वाझे यांना मनसूख हिरेन हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महानगरातील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात होते.
सचिन वाझे यांनी नियमित जामिनासाठी काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यात त्यांनी या प्रकरणातील अनिल देशमुखांसह इतर सर्वच आरोपींना जामीन मंजूर झाल्याची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती. कोर्टाने त्यांचा हा युक्तिवाद मान्य करत त्यांना जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गत 23 ऑगस्ट रोजी वाझे यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज जारी करण्यात आला. त्यानुसार सचिन वाझे यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे सचिन वाझे यांनी या प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारीही दर्शवली होती, पण ईडीने त्याला कडाडून विरोध केला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे हे 1990 च्या बॅचमधील पीएसआय आहेत. त्यांच्या नावावर तब्बल 63 एन्काउंटर आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसच्या मृत्युमुळे ते वादात सापडले होते. युनूसचा 2004 मध्ये कोठडीत मृत्यू झाला गहोता. त्यामुळे वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर वाझे यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला. पण सरकारने 2007 मध्ये तो फेटाळून लावला. त्यानंतर 2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाझे जून 2020 मध्ये पुन्हा पोलिस सेवेत रुजु झाले.

