पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी उद्बोधन
पुणे : आपण पूजा करतो, परमेश्वराची प्रार्थना करतो, ती प्रत्येकाने मनापासून करायला हवी. जेवढी मनापासून प्रार्थना करू, त्यापेशा जास्त श्रद्धेने ईश्वर आपला स्वीकार करेल. समुद्रमंथानातून १४ रत्ने निघाली ही आपली आस्था आहे. जशी समुद्राची खोली काळात नाही, तशी ह्रदयाची खोली देखील कळत नाही. त्यामुळे आपण या ह्रदयरुपी समुद्राचे मंथन करत राहायला हवे, त्यातून शेवटी नक्कीच अमृतकलश प्राप्त होईल, अशी आशा प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी पुणेकरांशी बोलताना व्यक्त केली.
पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या दुस-या दिवशी (शनिवार, दि.१६ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते.

श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, रामा रामा रटते रटते…बिती रे उमरिया, जो सुख पायो राम भजन मै, बोलो जय हनुमान यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
डॉ. कुमार विश्वास म्हणाले, समुद्रमंथनाच्या सुरुवातीला ‘विष’ बाहेर आले. त्याप्रमाणे आजच्या काळात सुरुवातीला प्रत्येकाला विषरुपी अपमानाला सामोरे जावे लागते. त्यानंतरच आपल्याला प्रतिभारूपी गाय म्हणजे ‘कामधेनू’ प्राप्त होते. त्यानंतर हळूहळू आपल्या संकल्पाना गती देणारा ‘उच्चैश्रवा’हा घोडा मिळतो. त्यावर बसून संघर्ष करणा-या आणि दृष्ट्या भावाने जगाकडे पाहणा-या व्यक्तीस ‘ऐरावत’ हत्ती मिळतो.
ते पुढे म्हणाले, अशा यशस्वीतेच्या हत्तीवर बसून मार्गक्रमण करताना जग आपल्या कपाळावर ‘कौस्तुभ मणी’ रुपी विजय तिलक लावते. त्यानंतर आपण जी इच्छा मागू, ती पूर्ण करणारा ‘कल्पवृक्ष’ आपल्याला प्राप्त होतो. याच वेळी अनेकदा अप्सरा रुपी असलेली ‘रंभा’वासनेच्या रूपात येण्याची शक्यता देखील असते. त्या अप प्रवृत्तीवर विजय मिळविला, तर ‘लक्ष्मी’ माता आपल्यावर प्रसन्न होते आणि ‘चंद्र’ शीतलतेच्या माध्यमातून विराजमान होतो. त्याचवेळी आपल्या विजयाचा घोष ‘पांचजन्य’ च्या माध्यमातून जगात दुमदुमतो. अंतिम टप्प्यात जगातील दु;खावर उपचार करणारा ‘धन्वतरी’ प्राप्त होतो आणि शेवटी ‘अमृत’ मिळवून आपण मृत्यूनंतरही जिवंत राहतो, हे समुद्रमंथन, १४ रत्ने आणि मानवी जीवनातील संबंधाचे सार आहे.
पुण्यामध्ये गणेशोत्सवात आनंद व दु:खाचा मिलाफ हीच खरी आस्था
गणेशोत्सवात पुण्यामध्ये मातीच्या गणपतीचे आगमन होते, त्यानंतर उत्साहात पूजन आणि विसर्जन होते. यावेळी आगमन होताना पुणेकरांच्या चेह-यावर आनंद असतो आणि विसर्जनाच्या वेळी पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा दिसतात, तेथे दु:ख असते. त्यामुळे पुण्यात आस्था प्रत्येकामध्ये दिसून येते. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला. त्यांच्यामध्ये महत्वाकांक्षा होतो. ती ठेवणे चुकीचे नाही, मात्र त्यामागे वेडे होणे चुकीचे आहे. महत्वाकांक्षा अमृत आहे, तर त्यातून काहीतरी मिळविण्याची हावरटपणाची वृत्ती ही विष आहे. हेच आजच्या युवकांना अध्यात्माद्वारे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

