मुंबई-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिवसा राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात रात्री एक गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत महायुतीने मनसेच्या निवडक उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचा मोठा दावा केला जात आहे. या वार्तेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यात रात्री उशिरा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवडी वरळी, माहीमसह अन्य काही मतदार संघांतील लढतीवर चर्चा झाली. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नाही. पण त्यात महायुतीने मनसेच्या काही निवडक उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघांत बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मनसेने ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यातच महायुतीने मनसेला निवडक जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मध्यरात्री 12 वा. नागपूरहून मुंबईत पोहोचले. त्यानंतर त्यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोन्ही नेत्यांचा ताफा वरळीपर्यंत आला आणि त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यानंतर मध्यरात्री उशिरा शिंदे, फडणवीस व राज ठाकरे यांची एका हॉटेलमध्य भेट झाली. त्यानंतर पहाटे 3 च्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे आपल्या वर्षा निवासस्थानी, तर देवेंद्र फडणवीस आपल्या सागर बंगल्यावर गेले.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुती आता मनसेच्या निवडक उमेदवारांना पाठिंबा देऊन राज ठाकरे यांच्या पाठिंब्याची परतफेड करणार असल्याची माहिती आहे.
मनसेच्या 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा-मनसेने आतापर्यंत शिवडी, पंढरपूर, लातूर ग्रामीण, हिंगोली, चंद्रपूर, राजुरा व यवतमाळ या 7 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात मुंबईतील शिवडी मतदारसंघातून मनसेने आपले ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांना संधी दिली आहे. तर पंढरपूर येथून दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण येथून संतोष नागरगोजे, हिंगोली येथून बंडू कुटे, चंद्रपूर येथून मनदीप रोडे, राजुरा येथून सचिन भोयर व यवतमाळ येथून राजू उंबरकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.