आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु असलेल्या योजना बंद करण्याचा अधिकार आयोगाला आहे काय ?
सातारा-: लाडकी बहिण योजना निवडणुका जाहीर होण्यापूर्वीची योजना आहे,निवडणुका लागण्यापूर्वी २/३ महिने अगोदर पासून महिलांना पैसे द्यायला सुरुवात झालेली योजना आहे . ती आचार संहितेचे कारण देऊन निवडणूक आयोगाने बंद केली असा खोटा प्रचार करण्यात येत असून ,आचारसंहिता असल्याने लाडकी बहीण योजना काही महिने बंद केल्याचे सांगत राज्य सरकार खोटे बोलत आहे. राज्य सरकारने ही योजना आर्थिक टंचाईमुळे व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बंद केली असून, राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीने फसविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
जिल्हा काँग्रेस कमिटीत पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, “महाविकास आघाडीची पहिली जागा वाटप यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा निर्णय सुरू असून, दोन दिवसांनंतर अर्ज भरले जाणार आहेत. काँग्रेसचे दोन राष्ट्रीय पातळीवरील निरीक्षक महाराष्ट्रात आले आहेत. महाविकास आघाडीचा निवडणूक जाहीरनामा अंतिम टप्प्यात आला आहे. पंचसूत्री गॅरंटी कार्डद्वारे आश्वासन दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षांचे व्हिजन असे तीन टप्प्यात जाहीरनामा येत आहे. आजची लढाई विचारधारेची आहे. काँग्रेस सरकारने दिलेल्या वचननाम्यानुसार कर्नाटक, तेलगंणामध्ये आम्ही जे बोललो ते दिलेच आहे.”
“भाजपने लाडकी बहीण योजना बंद केली असून, शेतकरी सन्मान योजना बंद होणार आहे का? प्रधानमंत्री आवाज योजना थांबणार आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे. हे महायुतीसरकार योजना कोणाची, या श्रेयवादात अडकले. लोकांची दिशाभूल करून निवडणुका जिंकता येत नाहीत. कृषीविषयक धोरणामुळे दररोज महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा जास्त आत्महत्या होत आहेत. विधानसभेची आजची लढाई ही विचारधारेची आहे. यामध्ये महायुती सरकार पैशाचा वापर करत आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सातारा जिल्हा हा फुले- शाहू आंबेडकर यांच्या विचारावरच चालणार आहे. शिवछत्रपतींच्या आदर्शावर आम्ही चालणार आहोत. जाती-धर्माचे विभाजन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु भाजप हा सत्तेसाठी हापापलेला पक्ष असून, केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत आहे,” असा आरोप चव्हाण यांनी केला.

