पुणे:
रविंद्र धंगेकरांकडून वाटप करण्यासाठी निघालेला दिवाळी फराळाचा टेम्पो भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडविला आहे. त्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात हा फराळाचा टेम्पो नेण्यात आला आहे.
भाजपने तक्रार केल्यानंतर आमदार रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. रविंद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असं पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी स्पष्ट केलं होतं. रविंद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळाचे वाटप करण्यात येत होते. यानंतर भाजपने ही बाब निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिल्याची माहिती पुण्याचे भाजप प्रवक्ते पुष्कर तुळजापुरकर यांनी दिली.आचारसंहितेचा भंग होत असल्याचे विद्यमान आमदारांना समजत नाही का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे. बिनधास्त तुम्ही दिवाळी फराळ वाटत आहेत. तुम्ही पडणार आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवालही तुळजापुरकर यांनी केला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले
नागरिकांच्या दिवाळीत सहभागी व्हावे म्हणून दरवर्षी माझा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ नागरिकांना भेट म्हणून देतो. त्याप्रमाणे यंदाही ‘आनंदाची दिवाळी’ माझा मित्रपरिवार देत असावा. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित केला आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. कुठल्याही प्रकारच्या वस्तूचे वाटप करण्यात माझा व्यक्तीश: सहभाग नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. मी अजून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तरीपण माझा विजय पक्का असल्याने विरोधकांच्या छातीत आत्तापासूनच धडकी भरल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून विविध वस्तूंचे वाटप पुण्यात सुरू आहे. त्यांनी जरूर वाटप करावे. पण जर माझा मित्र परिवार ‘आनंदाची दिवाळी’ वाटप करतोय म्हणून त्यांना रोखत असाल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून होणाऱ्या वस्तूंचे वाटप कोण रोखणार ? माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावरही नक्कीच होवू शकतो.

