पुणे: खराडीत ब्रिटिश गायक ॲलन वॉकर यांच्या संगीत रजनीमध्ये (लाइव्ह कॉन्सर्ट) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ३६ जणांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी मुंबई आणि हैदराबादमधील चोरट्यांच्या टोळीतील चौघांना अटक केली.सय्यद महम्मद इद्रिस शेख (वय २१, रा. मुंबई), अखिल व्यंकटरमणा गोदावरी (वय २४, रा. हैदराबाद), लोकेश हनुमंत पुजारी (वय ३१, रा. मुंबई) आणि पप्पू भागीरथी वैश्य (वय २४ रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.खराडीतील न्यू इंग्लिश फिनेक्स स्कूलच्या मैदानावर १८ ऑक्टोबर रोजी रात्री लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चार लाख ८७ हजार रुपये किमतीचे ३६ मोबाईल चोरून नेले. याबाबत नागरिकांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिली