; याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापन दिन सोहळा ; प्रसाद ओक, मंदार आगाशे यांना यंदाचा युवा कलाकार व युवा उद्योजक पुरस्कार
पुणे : आज फिल्म इंडस्ट्री विकसित झाली आहे तरी त्याला उद्योगाचा दर्जा मिळत नाही. ताण-तणाव विसरण्यासाठी उद्योजक आमचा उपयोग करून घेतात पण तरीही सिने क्षेत्राला उद्योगाचा दर्जा नाही. या क्षेत्रालाही व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे, असे मत अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या वर्धापनदिनानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कॉसमॉस बँकेचे सचिन आपटे, सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी व कार्यवाह श्रीकांत जोशी उपस्थित होते.
सोहळ्यांतर्गत सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार व स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार अनुक्रमे अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता प्रसाद ओक आणि सर्वत्र टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संस्थापक, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंदार आगाशे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रसाद ओक म्हणाले, कलाकारांना सुद्धा व्यावसायिक समजले गेले पाहिजे. त्यांचे कुटुंब त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. व्यावसायिक कलाकार म्हणून दर्जा मिळण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत, असेही ओक यांनी सांगितले.
सचिन आपटे म्हणाले, जेव्हा मेहनतीचा पाया मजबूत असतो तेव्हाच यशाला चकाकी येते. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आपण आहोत. देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे तरच देशाचा विकास होईल.
मंदार आगाशे म्हणाले, व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा यूपीआय आणि कार्ड पेमेंट हे भारतात नवे होते. सुरुवातीचे सहा महिने लोकांनी केलेली टीका सहन केली. परंतु मी आणि माझ्या टीमने एक ध्येय ठेवले होते, त्यातूनच सर्वत्र टेक्नॉलॉजी नावारूपास आले.
चारुहास पंडित म्हणाले, मराठी ब्राह्मण कुटुंबात कलेच्या प्रांतात जाणारे लोक कमी असतात आणि कलेच्या प्रांतात जाताना सर्वात जास्त विरोध घरातूनच होत असतो. कुठेतरी मुलांना एक स्फूर्ती मिळावी की कलेच्या प्रांतात पण बरच काही करता येऊ शकते आणि त्यांच्या आई-वडिलांना पण कुठेतरी आशा दिसावी की यात करिअर होऊ शकते या दृष्टीने कलाक्षेत्रातील पुरस्कार देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. मंजुषा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. आशिष कुलकर्णी यांनी आभार मानले.
चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळायला हवा-अभिनेता प्रसाद ओक
Date:

