पुणे-पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोप श्रीकांत पांगारकर याने शनिवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे पक्षप्रवेशानंतर पांगारकर यांची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती देखील केली. श्रीकांत पांगारकरांच्या पक्षप्रवेशावरुन विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
हे अतिशय धक्कादायक आहे. गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले, याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण असल्याचे सुळे यांनी म्हटले. प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.श्रीकांत पांगारकर हे पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याच्या संपर्कात असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे एसआयटीने श्रीकांत पांगाकरला 2018 मध्ये अटक केली होती. 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने श्रीकांत पांगारकरांचा जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आता त्यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

