पुणे, दि. १९: सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी विमाननगर येथील सिम्बायोसीस लॉ कॉलेज येथील विद्यार्थ्यांसोबत रस्ता सुरक्षेबाबत संवाद साधला.
यावेळी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील, सिम्बायोसीस लॉ कॉलेजच्या संचालक डॉ. शशिकला गुरपुर, उप संचालक अपराजिता मोहंती आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री. सप्रे म्हणाले, रस्ते अपघातामध्ये दुचाकी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या मोठी असून या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरीता दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. याकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी हेल्मेटचा वापर करून, इतर सर्व महाविद्यालयांसाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन श्री. सप्रे यांनी केले.
राज्यामध्ये रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे नमूद करुन ते म्हणाले पुण्यामध्ये दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे दिसून येते. ही परिस्थिती विद्यार्थ्यांनी बदलावी असे आवाहनही श्री. सप्रे यांनी केले. तसेच सिम्बायोसीस लॉ कॉलेज यांनी रस्ता सुरक्षेसंदर्भात महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा क्लब स्थापन करावा, अशी सूचना त्यांनी केली.
श्री. भिमनवार म्हणाले, रस्ता सुरक्षा हा महत्वाचा विषय असून याकरिता परिवहन विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याबद्दल नमुद केले. राज्यामध्ये मागील दोन वर्षात रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असल्याचे नमूद केले. तसेच सिम्बायोसीस लॉ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हेल्मेटचा वापर करून रस्ता सुरक्षेसंदर्भात एक चांगले उदाहरण दाखवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती मोहंती यांनी केले.
0000