न्यायमुर्ती श्री.अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली वाहन उत्पादक आणि वाहन वितरकांची बैठक संपन्न
वाहन वितरकांनी सीएसआर फंडामधून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करावी-न्यायमूर्ती अभय सप्रे
पुणे,दि.१९:- वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरक यांनी केवळ व्यवसायीक दृष्टीकोन न ठेवता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समिती अध्यक्ष तथा सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.अभय सप्रे यांनी केले.
विधान भवनातील झुंबर हॉल येथे मोटार वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरकांच्या बैठकीत ते बोलत होते. परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती श्री.सप्रे म्हणाले, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी याकरिता वाहन वितरकांनी ग्राहकांचे प्रबोधन करावे तसेच हेल्मेटचा वापर करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. कायद्यातील तरतूदीनुसार ग्राहकास दुचाकीसोबत मोफत हेल्मेट देणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करणे आवश्यक आहे. वाहन उत्पादक कंपन्या व वाहन वितरक यांनी परिवहन विभाग तसेच पोलीस विभागासोबत ताळमेळ ठेवून रस्ता सुरक्षा संदर्भात वाहनधारकांना मार्गदर्शन करावे. वाहनचालकांना विशेषकरुन तरुणवर्गाला वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी ‘ट्रॅफीक पार्क’ सारखे उपक्रम राबवून त्यांच्यामधे रस्ता सुरक्षेसंदर्भात जागृती होईल याकरिता प्रयत्न करण्याचे न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी आवाहन केले.
वाहनाचा वीमा न काढताच वाहनचालक रस्त्यावर वाहने चालवतात ही अतिशय गंभीर बाब आहे. अशा वाहनचालकांवर कायद्याच्या चौकटीत तातडीने दंडनीय कारवाई करावी असे सांगून पाच वर्षासांठी त्रयस्थ पक्ष विमा वाहनचालकांनी काढावा यासाठी वाहन उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करावा, यामुळे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत होईल असे न्यायमूर्ती श्री.सप्रे यांनी सांगितले केले.
परिवहन आयुक्त श्री.भिमनवार यांनी, मागील मागील दोन वर्षामध्ये वाहन उत्पादक कंपन्यांनी सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षे संदर्भात उपाययोजना करण्यासंबंधी पुढाकार घेतला नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.
वाहन उत्पादक कंपन्यांनी एखाद्या विशिष्ट भागावरती लक्ष केंद्रित करून रस्ते सुरक्षे संदर्भात कार्य करावे, रस्ता सुरक्षा संदर्भात परिवहन विभागाकडे वेगवेगळ्या संकल्पना असून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याकरिता सीएसआर फंडातून खर्च करण्याकरिता कंपन्यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. वाहन धारककांनी हेल्मेट, सीटबेल्ट वापरणेबाबत तसेच रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत वाहन उत्पादक कंपन्यांनी जनजागृती करावी असे आवाहन केले. बैठकीकरिता उपस्थित वाहन उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व वाहन वितरक यांनी सीएसआर फंडातून रस्ता सुरक्षेसंदर्भात कामकाज करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस वाहन उत्पादक कंपनी व वाहन वितरक यांचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे, पिंपरी चिंचवड तसेच परिवहन विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
०००