आज दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी पंडीतजींचे देहावसान झाल्याचे कळले आणि पंडितजींच्या संपूर्ण जीवनकार्य समोरून तरळून गेले. अशा या चालत्याबोलत्या संस्कृतच्या विद्यापीठाला आमच्या कराड कुटुंबियांच्या आणि एमआयटी शिक्षण संस्थेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली वाहतो !
लेखक : प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड
अध्यक्ष, विश्व शांती केंद्र, माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे, भारत
दुर्लभं भारते जन्म । महाराष्ट्रे सुदुर्लभम् ॥
या उक्तीनुसार भारतात जन्म मिळणे कठीण आणि महाराष्ट्रात जन्म मिळणे अतिशय दुर्लभ आहे. आपल्या भारताला सत्यनिष्ठा, ज्ञाननिष्ठा, धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा अशा महापुरुषांची आणि द्रष्ट्या सत्पुरूषांची जणू परंपराच लाभली आहे. परंतु, दुर्दैवाने, हिमालयाच्या उंचीची आदर्श माणसे दुर्मिळ होत गेली आणि ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पहावे, ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, अशा वंदनीय व्यक्ती अलीकडे अभावानेच आढळतात.
या सर्व पार्श्वभूमीवर स्व. पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या जीवनातील सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य समाजाला निश्चितपणे मार्गदर्शक ठरत असल्याचे मान्य करावे लागेल.
मला प्रांजळपणे नमूद करावेसे वाटते की, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या खालील उक्तीनुसार आपण सदैव चांगल्या व्यक्तीं वा घटनां यांच्यापासून शोध व बोध घेण आपल कर्तव्य आहे.
मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण॥
पंडित वसंतराव गाडगीळ यांना आपण कितीही अडीअडचणीच्या, त्रासाच्या वेळी भेटलात तरी त्यांच्या चेहर्यावर एक प्रकारच स्मितहास्य व दृढ निश्चयाचा भाव स्पष्टपणे दिसायचा. त्यांच्या सुदृढ व संपन्न व्यक्तिमत्त्वाचे ते एक द्योतक होते.
मऊ मेणाहूणी आम्ही विष्णुदास । कठीण वज्रासी भेदूं ऐसे ॥
पंडित वसंतराव गाडगीळ म्हणजे खर्या अर्थाने वैष्णव व शैव पंथाचे समन्वयक होते. हरी हरामध्ये किंवा इतर सर्व जातीधर्मांच्यामध्ये त्यांना कधीच भेद दिसला नाही. ते खर्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त व हाडाचे वारकरी होते.
पंडित वसंतराव गाडगीळांची आणि माझी पहिली भेट टिळक स्मारक मंदिरामध्ये झाली. जगात देव आहे की नाही अशा आणि धर्म, श्रध्दा, अंधश्रद्धा अशा विविध स्वरूपाच्या विषयांवर वादविवाद व चर्चा आयोजित करण्यात आली होती. अशा स्वरूपाच्या चर्चेमध्ये ईश्वराचे अस्तित्व मानणारे व ईश्वराचे अस्तित्व अजिबात न मानणारे लोक हजर होते. त्यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ यांनी अत्यंत शास्त्रशुध्द पध्दतीने ईश्वराचे अस्तित्व सिध्द करण्याविषयी जे विचार व्यक्त केले, ते मला अंत:र्मुख करणारे वाटले. त्यावेळेपासून माझ्या मनामध्ये पंडित गाडगीळांच्या ज्ञानसाधनेविषयी एक प्रकारचा आदरभाव निर्माण झाला आणि नकळत आमचे ऋणानुबंध घनिष्ठ होत गेले.
पुढे हळुहळु गाडगीळांच्या ठायीच्या नि:स्पृहतेची अधूनमधून प्रचिती येवू लागली आणि त्यांच्या अंतर्यामी वास करीत असलेल्या सात्विक भावाची व निर्मळ मनाची ओळखही पटली. अतिशय विद्वान अशा पंडित गाडगीळांच्या व्यक्तिमत्त्वात, भारतीय संस्कृतीचे व सद्गुणांचे यथार्थ असे मूर्तिमंत दर्शन घडायचे, अशी माझी भावना आहे.
आपल्या भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व वैचारिक असे परिवर्तन घडत आहे. त्यातून नवनवीन पुरोगामी विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न चालू आहे. समाज विघातक अशा बुरसटलेल्या अनेक रूढी परंपरा लोप पावत आहेत, हे एक शुभलक्षणच आहे. तथापि दुर्दैवाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली मूलभूत अशा श्रद्धेलाच तडा जातो की काय? अशी भीती निर्माण होते आहे. अशावेळी गीतेतील खालील सिध्दांताची समाजाला जाणिव करून देणे मला गरजेचे वाटते.
पंडित वसंत गाडगीळ हे आपले विचार व्यक्त करताना आपल्या भूमिकेशी अगदी ठाम असत. तसेच, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये मेळ घालत असतानाच, त्यांच्या प्रत्येक कृतीतून, ते प्रभावीपणे समन्वय साधत असल्याची प्रचिती यायची. यातच पंडित गाडगीळांचे वैशिष्टय होते.
अगदी लहानपणीच १२ – १३ वर्षाच्या वयातच वसतरावांनी कोल्हापूरहून त्यांच्या चुलत भावाकडे, त्यावेळच्या अखंड भारतातील कराचीला प्रयाण केले. त्यानंतरचा त्यांचा जीवनाचा प्रवास खर्या अर्थाने उद्बोधक ठरत गेला असे दिसते.
सोरटी सोमनाथच्या सोमेश्वराची प्राणप्रतिष्ठा भारताचे पहिले राष्ट्रपती कै. बाबू राजेंद्रप्रसाद यांच्या शुभहस्ते १९५२ साली झाली. त्यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पुढाकाराने तरूण वयातील वसंतराव गाडगीळ यांना स्वयंसेवकाची भूमिका देण्यात आली होती. दुर्दैवाने त्यावेळचे टोपलीचे संडास साफ करणारे मेहतर समाजातील सेवक अचानकपणे संपावर गेलेले, संडास साफ करण्यासाठी इतर कोणी हाताखाली माणसे नसल्यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी स्वत:च हातात खराटा घेवून त्यावेळची टोपलीच्या संडासांची साफसफाई सुरू केली. हे वसंत गाडगीळांनी पाहिले आणि त्याच क्षणी त्यांनी तर्कतीर्थांचं हे काम नाही असे सांगून, त्यांच्या हातातला खराटा व बादली घेवून संडास साफ करण्याचे काम स्वत:कडे घेतले. तर्कतीर्थांना वसंत गाडगीळांचे हे कोणताही संकोच वा लाज न बाळगता अगदी तरूण वयात, उत्स्फूर्तपणे त्यांनी स्वत: होऊन स्वीकारलेले संडास साफकरण्याचे काम पाहून, खूप मोठा अचंबा वाटला व मनातून या पोराचे कौतुकही वाटले.
त्या दिवसापासून तर्कतीर्थांनी वसंत गाडगीळांना ब्रम्हवृंदाला पाणी पुरविण्याचे पाणक्याचे काम सोडून गाभार्यातील पुजाअर्चेच्या वेळी पुजेचे साहित्य पुरविण्याची जबाबदारी सोपवली. गाडगीळांना त्यावेळी आपल्याला फार मोठी बढती वा प्रमोशन मिळाल्याचा आनंद झाला.
प्राणप्रतिष्ठेच्या समाप्ती नंतर पौराहित्य करणार्या अनेक विद्वान ब्रम्हवृदांच्या बरोबरीनेच महावस्त्र व दक्षिणा प्रदान करुन तर्कतीर्थांनी स्वत: गाडगीळांना सन्मानित केले. गाडगीळांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा प्रसंग वसंत गाडगीळांच्या जीवनाला विधायक स्वरूपाची कलाटणी देणारा ठरला, त्यावेळेपासून वेदविद्या, धर्मशास्त्र व संस्कृत भाषेचा अभ्यास करण्याचा गाडगीळांनी सकल्प सोडला.
पुढे गाडगीळांच्या जीवनामध्ये कालानुरुप, बदलत्या परिस्थितीनुसार त्यांनी अंगीकारलेल्या कार्याचे दुसरे एक उदाहरण म्हणजे गाडगीळांनी हिंदुधर्मातून धर्मांतर केलेल्या अनेक व्यक्तींना पुन्हा हिंदुधर्मात सामील करून घेण्याचे फार मोठे सामाजिक कार्य केले.
पंडित वसंतराव गाडगीळांच्या या समाजाभिमुख आणि सुधारणावादी जीवनाचा वेध घेतल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, त्यांचे जीवन खर्याअर्थाने समर्पित वृत्तीच्या ब्राम्हण्याला साजेसे होतेे. दुर्दैवाने सध्या मात्र नकळत भारतीय संस्कृती व परंपरेचा र्हास होत असताना दिसतो. यात दोष कोणी कोणाला द्यायचा हे समजत नाही. अभक्ष भक्षण आणि अपेय पान ही सध्याची संस्कृती बनत चालली आहे. अशा स्थितीत पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या सात्विक व समर्पित जीवनाची वाटचाल अर्थपूर्ण आहे, असे वाटते.
सध्या मात्र सर्व जगातल्या अनेक देशांनी संस्कृत भाषेचा सखोल अभ्यास करण्याचे कार्य सुरू केल्यानंतर आपल्या भारतीयांना संस्कृत भाषेचे महत्व पुन्हा पटू लागले आहेे. संगणक तज्ञ महाराष्ट्रभूषण डॉ. विजय भटकर यांनी सर्व जगाला ओरडून, या पुढे संस्कृत भाषा ही संगणकाच्यासाठी सर्वात योग्य भाषा ठरेल असे ठामपणे सांगण्यास सुरूवात केली हे आपले भाग्य आहे.
पंडित गाडगीळांचे, एरवी अत्यंत क्लिष्ट वाटणार्या संस्कृत भाषेवरील प्रभुत्व, चिंतन, मनन व व्यासंग हे एक त्यांच्या जीवन साधनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. खर्या अर्थाने या भाषेला सुबोधता आणि गेयता प्राप्त करून देण्याचा पंडित वसंतराव गाडगीळांनी कसोशीने प्रयत्न केला. सर्वसामान्य श्रोत्यांना त्यांचं संस्कृतमधील भाषण ऐकणं ही एक पर्वणीच असायची. संस्कृत भाषा एवढी सोपी, सुबोध व रसाळ आहे याची तेंव्हा जाणिव व्हायची.
‘ज्ञानसाधना’ हेच ध्येय व ‘सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा’ असे मानून पंडित वसंतराव गाडगीळांनी अनेक अडीअडचणीतून सुध्दा आपल्या जीवनातील साधना चालू ठेवली आहेे. पंडितजींच तीन खोल्याच घर पाहिलं तर जणु कांही अनेक ग्रंथांच्या व पुस्तकांच्या गुहेमध्येच वसंतराव गाडगीळ राहतात असे आपल्याला दिसेल. या व्यक्तीने आयुष्यभर ग्रंथ संपदा प्राप्त करून, आपले स्वत:चे व समाजाचेही जीवन समृध्द केले आहे.
खर्या अर्थाने पंडित वसंतराव गाडगीळ हे मला एकविसाव्या शतकातील एक ऋषितुल्य असेच व्यक्तिमत्त्व वाटते.
माऊलींच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये राजबाग, लोणी काळभोर येथे ‘विश्वशांती गुरुकुल’ प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्या शुभप्रसंगी भूमिपूजनाच्या निमित्ताने पंडित वसंतराव गाडगीळ, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, शतंजिवी योगमहर्षि थोर स्वातंत्र्य सेनानी श्री शेलारमाला यांचे मिळालेले आशीर्वाद आणि सदिच्छा मला फार मोलाच्या वाटतात. विश्वशांती गुरूकुल संकल्पना रूजूवात करण्याच्या भूमिकेतून या गुरूकुलाचा प्रमुख आचार्य वा गुरू कसा असावा, कोण असावा, याचा जेंव्हा मी विचार करू लागलो तेंव्हा मला पंडित वसंतराव गाडगीळ हेच या गुरूकुलाचे आचार्य शोभतील अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली व त्यानुसार मी पंडितजींना ही जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली, व ती त्यांनी मनापासून स्वीकारली, हे आमचं भाग्य. आमच्या जीवनात गुरूवर्य पूज्य साखरे महाराज, पंडित वसंतराव गाडगीळ, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.विजय भटकर यांच्या झालेल्या भेटी हा आम्ही आमच्या पूर्वजन्माचा ऋणानुबंध मानतो.
ज्ञानाचे खरे उपासक असणारे पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या जीवनाचा प्रवास व वाटचाल बारकाईने अभ्यासल्यानंतर, पंडित वसंतराव गाडगीळ हे माझ्यामते खर्याअर्थाने चालते-बोलते ज्ञानपीठच आहेत अशी माझी भावना आहे.
भारतीय धर्म, संस्कृती आणि परंपरा हाच ज्यांचा श्वास आहे आणि संस्कृत हेच ज्यांनी आपले जीवन मानले आहे, अशा पंडित वसंतराव गाडगीळ यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा अमृत महोत्सवी सोहळा आमच्या संस्थेच्या वतीने २००५ साली संपन्न झाली आणि त्यावर कळस म्हणजे २०१२ मध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे आत्ताचे पंतप्रधान मा. श्री. नरेद्र मोदीजी यांनी पंडीजींच्या कार्याचा गौरव केला.